Chan Chan Kavita | बाळ बोलू लागलं की, त्याच्या बोबड्या बोलीत गाणं ऐकायला सगळ्यांनाच आवडतात. आताचा काळ हा cocomelon चा असला तरी देखील आपल्या लहानपणी ऐकलेल्या काही कविता तरी बाळांना याव्यात असे प्रत्येक पाल्याला वाटते. जुन्या कविता आता फार कमीच पुस्तकात पाहायला मिळतात. हेच लक्षात घेऊन आज आपण अशा काही कविता जाणून घेणार आहोत. ज्यांचा काळाआड तुम्हालाही कदाचित विसर पडला असेल. पण या लेखातून पुन्हा या कवितांच्या चाली तुम्हाला आठवतील.
लहान माझी बाहुली
तुमच्या लहानपणातील तुमची एखादी बाहुली तुमच्याकडे अजूनही आहे का? तर तुम्हाला लहानपणी वाचलेली किंवा ऐकलेली ही कविता छान छान कवितांमध्ये नक्की वाचा.
लहान माझी बाहुली
मोठी तिची सावली
घारे डोळे फिरविते
लुकलुक ही पाहते
नकटे नाव उडविते
गोबरे गाल फुगविते
दात काही घासत नाही
अंग काही धुत नाही
भात केला करपून गेला
पोळ्या केल्या, कच्च्या झाल्या
वरण केले, पातळ झाले
तूप सगळे सांडून गेले!
असे भुकेले नका जाऊ
थांबा करते गोड खाऊ
केळीचे शिकरण करायला गेली
दोनच पडले दात,
आडाचे पाणी काढायला गेली धपकन पडली आत
छोटेसे बहीण भाऊ Chan Chan Kavita
लहानपणी बहीण भावांचे नाते हे खूप खास असते. या नात्यावरील हे मस्त गाणे
छोटेसे बहीण भाऊ
उद्याला मोठाले होऊ
उद्याच्या जगाला, उद्याचा युगाला
नवीन आकार देऊ
छोटेसे बहीण भाऊ
ओसाड उजाड जागा
होतील सुंदर बागा
शेतांना, मळ्यांना, फुलांना, फळांना
नवीन बहार देऊ
मोकळ्या आभाळी जाऊ
मोकळ्या गळ्याने गाऊ
निर्मळ मनाने, आनंदभराने,
आनंद देऊ, घेऊ
प्रेमाने एकत्र राहू
नवीन जीवन पाहू
अनेक देशांचे,भाषांचे, वेशांचे
अनेक एकच होऊ
कवी : वसंत बापट
पाऊस
येरे येरे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा || 1 ||
पाऊस पडला झिम् झिम् झिम्
अंगण झाले ओले चिंब
पाऊस पडला मुसळधार
रान झाले हिरवेगार || 2 ||
ये ग ये ग सरी
माझे मडके भरी
सर आली धावून
मडके गेले वाहून || 3 ||
देव
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पडे त्याचे
सुंदर ही झाडे सुंदर पाखरे
किती गोड बरे गाणे गाती
सुंदर वेलीची सुंदर फुले
तशी आम्ही मुले देवा तुझी
माझा घोडा
टपटप टपटप टाकित टापा चाले माझे घोडा
पाठीवरती जीन मखमखी पायि रुपेरी तोडा
उंभ उभारी दोन्ही कान
ऐटित वळवी अपुली मान
मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा
घोडा माझा फार हुशार
पाठीवर मी होतो स्वार
घोडा माझा फार हुशार
पाठीवर मी होता स्वार
नुसता त्याला पुरे इशारा, कशास चाबुक ओढा ?
घोडा माझी घाली रिंगण
उखडून टाकी सारे अंगण
काही त्याला अडवत नाही, नदी असो की ओढा
सात अरण्ये, समुद्र सात
ओलांडित हा दमात
आला आला आला माझा घोडा, आधी रस्ता सोडा
माझे घर
पलीकडे ओढ्यावर,
माझे गाव ते सुंदर
झाडाझुडुपात आहे
लपलेले माझे घर
माझ्या गावातून जाते
चिमुकली हीच वाट
मला ओढुनीया नेते
माझ्या घराशी ही थेट
पिंपळाच्या झाडापाशी
लहानसे माझे घऱ,
तुळशीचे वृंदावन
चिरेबंदी ओट्यावर
माझी आई तेथे दारी
माझ्या भावंडांचा मेळा
घरी गेल्यावर होतो
माझ्या भोवताली गोळा
फुलपाखरु
फुलपाखरु!
छान किती दिसते , फुलपाखरु!
या वेलीवर | फुलांबरोबर
गोड किती हसते | फुलपाखरु
पंख चिमुकले| निळे जांभळे
हालवुनी झुलते | फुलपाखरु
डोळे बारिक | करिती लुकलुक
गोल मणी जणुं ते | फुलपाखरु
मी धरु जाता | येई न हाता
दुरचं ते उडते | फुलपाखरु
आला पाऊस आला
पाऊस पडतो सर सर सर!
घरी चला रे भर भर भर!
पाऊस वाजे, धडाड धूम
धावा धावा, ठोका धूम
धावता धावता गाठले घर
पड रे पावसा दिवसभर
पड रे पावसा चिडून चिडून
आईच्या कुशीत, बसलो दडून!
– शांता शेळके
अग्गोबाई ढग्गोबाई
अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ
थोडी ना थोडकी, लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार || धृ ||
वारा वारा गरागरा सो सो सूम….
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम
वीजबाई कशी आली तोऱ्यामध्ये खडी
आकाशाच्या पाठीवर चम चम छडी || १ ||
खोल खोल जमिनीचे उघडून दार
बुड बुड बेडकाची बडबड फार!
डुंबायला डबक्याचा करुया तलाव
साबु-बिबु नको.. थोडा चिखल लगाव!|| २ ||
– संदिप खरे
झोपाळा
झू झू झोपाळा
नेऊ चला आभाळा
झोका जाई वर वर
वारा येई भरभर
झोक गेला उंच
खूप खूप उंच
झोक्यावर बसू
खुदूखुदू हसू
छान छान गाणी गाऊ
खूप खूप झोके घेऊ
कोणाचे ग कोणाचे?
कोणाचे ग कोणाचे
सुंदर डोळे कोणाचे?
त्या पाण्यातील माशांचे
की माझ्या बाळांचे?
कोणाचे ग कोणाचे
लाल गाल कोणाचे?
झाडावरच्या गुलाबाचे
की माझ्या बाळाचे ?
कोणाचे ग कोणाचे
गोड बोल कोणाचे?
त्या गाणाऱ्या मैनेचे
की माझ्या बाळाचे?
कोणाचे ग कोणाचे
रुप गोजिरे कोणाचे?
आकाशातील चंद्राचे
की माझ्या बाळाचे?
– आशा गवाणकर
अजूनही छान छान कविता तुम्हाला वाचायच्या असतील तर तुम्ही हे पेज फॉलो करायला अजिबात विसरु नका.
अधिक वाचा
SANTOSHI MATA KATHA | संतोषी माता कथा 2023
KAKAD AARTI | काकड आरती संग्रह मराठी 2023
भात केला कच्चा झाला, वरण केले पातळ झाले……….कृृपया पुर्ण कविता मला हवी आहे.
भात केला कच्चा झाला, वरण केले पातळ झाले…….कृपया पुर्ण कविता नातवाला ऐकवायची आहे, ती द्यावी ही विनंती.
वर कविता पूर्ण आहे आपण ती नीट पाहावी.