Santoshi Mata Katha | संतोषी माता कथा 2023

Santoshi Mata Katha ही प्रत्येक देवी भक्ताच्या फार जवळची आहे. कारण अनेक जण संतोषी मातेचे कडक असे व्रत करतात. जे संतोषी मातेला मनापासून मानतात. ते दर शुक्रवारी आवर्जून देवीची पूजा करतात किंवा तिचे स्मरण करतात. संतोषी मातेची कथा ही देखील तितकीच वेगळी आणि रंजक आहे. तुम्हाला श्रीसंतोषीमातेची कथा माहीत आहे का? नसेल तर आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत संतोषी माता कथा. या शिवाय तुम्ही वटसावित्रीची कथा वाचायला हवी.

संतोषी मातेची प्रार्थना

संतोषी माता कथा

माता म्हणते, ‘ माझे हे सर्व माहात्म्य माझं सानिध्य प्राप्त करुन देणारं आहे. माझे माहात्म्य ऐकणाऱ्यांचे कल्याण करते.’

मातेचे हे आश्वासन आपणाला नि:संशय फलद्रूप होईल, म्हणूनच मातेची प्रार्थना करणं जरुर आहे. (संतोषी माता कथा)

‘माते, माझी ही पूजा स्विकारण्याची माझ्यावर कृपा कर. तुला मी हळदकुंकू, गंध, अक्षदा, पुष्पे वाहतो. नानाप्रकारच्या सुंदर पुष्पांची माला मी तुझ्या गळ्यांत घालीत आहे. तुझ्या पुढ्यांत ठेवलेला हा अन्नाचा महाप्रसाद, हे चणे आणि गूळ, ही निरनिराळी फळं स्विकारुन प्रसन्नतेनं केलेल्या या आरतीचा तू स्वीकार कर. तुझी मी ही पूजा केली आहे. माझे अपराध पोटात घालून माझ्या या पूजेचा स्वीकार कर.

हे सर्वशक्तिमान माते, इष्ट फल देण्यास तूंच समर्थ आहेस. या तुझ्या लेकराचे मनोरथ पूर्ण कर. मला सुखी ठेव. दीर्घायुषी कर.

माते, आमचें काही चुकले असेल तर क्षमा कर. आमच्यावर तू नेहमी अशीच कृपादृष्टी ठेव. माते, तुझ्या स्वरुपाचा वास ह्रदयमंदिरात कायम राहो. माझ्या मुखानं, तुझं नामस्मरण अहर्निश होवो. मी तुझ्या चरणकमलाला प्रणाम करीत आहे.

सिद्धिबुद्धिप्रदे देवि, भक्तिमुक्तिप्रदायिनी |
भव्यमूर्ते सदा देवी संतोषीमां नमोsस्तु ते ||
एषा भक्त्या तव विरतिचा मया देवि पूजा |
न्यूनं यत्तत्त्व करुणया पूर्णतामेति सद्य: ||
सानन्दं मे जननि ह्रदये तेेेsस्तु नित्यं निवास: ||
पूजामिमां पठेत्प्राज्ञ: पूजां कर्तुमनीश्वर:|
पूजाफलमवाप्नोति वांच्छितार्थ च विन्दति ||
प्रत्यहं भक्तियुक्तो य: पूजनीयमिदं पठेत |
वाग्वदिन्या: प्रसादेन वत्सरात्स कविर्भवेत |

संतोषी माता कथा (Santoshi Mata Katha)

एकदा नारदमुनि फिरत फिरत मनुष्यलोकांत आले. तिथे माणसं अनेक प्रकारची दु:खें भोगीत होती. दारिद्र्यानं पिचून गेली होती. त्या गांजलेल्या पिडलेल्या माणसांना पाहून नारदमुनींच्या मनांत दया उत्पन्न झाली; ते मग वैकुंठात भगवान श्रीविष्णूच्या भेटीसाठीं गेले.

भगवान श्रीविष्णूला पाहून नारदमुनीने त्यांची स्तुति करुन त्यांना नमस्कार केला.

‘हे प्रभो, तूं अनंत शक्तिमान आहेस. तूं आपल्या भक्तांची दु: खे नाहिशी करतोस. हे भगवंता, मनुष्य लोकांतील सर्व माणसं विविध प्रकारची दु:खें भोगीत आहेत. ते अत्यंत दरिद्री बनले आहेत. रोग, पीडा, भूक यांनी ती माणसं कष्टी बनली आहेत. त्या सर्व माणसांना दु:खस्थितींतून मुक्त करुन त्यांच्या सर्व इच्छा आपण पूर्ण कराव्या अशी माझी प्रार्थना आहे. परिस्थितीनं भयभीत झालेलीं तीं माणसं धनधान्यांनी समृद्ध होऊन आनंदी व्हावी म्हणून मी त्यांचं दु:ख आपणासमोर मांडण्यासाठी इथं आलों आहे. भगवंता, सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करुन मनांतील फल देणारे आपण आहांत. त्या पीडित माणसावर आपण दया करा.

‘मुनिवरा, या गोष्टीचा मी अवश्य विचार करुन त्यावर एखादा उपाय शोधून काढीन.’ भगवान श्रीविष्णूनें नारदमुनि यांना सांगितले. नंतर नारदमुनि तिथून निघाले.

भगवान श्रीविष्णूनें ही गोष्ट आपली प्रिय पत्नी लक्ष्मी हिच्या कानीं घातली. तेव्हा लक्ष्मी म्हणाली, ‘माणसांवर कृपा करण्याच्या हेतूनें मी गणेशाची कन्या म्हणून अवतार घेईन आणि माणसांचे जीवन संतोषाने भरुन काढीन.’

लक्ष्मीनं भगवान श्रीविष्णूला तसं आश्वासन दिले.

श्रीगणेश ऋद्धिसिद्धिसमवेत सुखानं संसार करीत होते. त्यांना दोन पुत्र ही झाले. रक्षाबंधनाच्या सणाप्रसंगी शिवपार्वतीची कन्या सरस्वती गणेशाला राखी बांधू लागली. आसमंतातील वातावरणात आनंदीआनंद निर्माण झाला. ते दोन पुत्र त्यावेळीं आपल्या आईवडिलांना म्हणाले,’ पिताजी, आम्हाला राखी बांधण्याकरितां बहीण नाहीं, आम्हाला बहीण हवी. ‘

त्यावेंळी नारदमुनि देखील तिथं होते. मुलांनी बहिणीसाठीं अगदी हट्टच धरला. तेव्हां गणेशानं आपला उजवा हात वर केला. त्या हातांतून एक तेज:पुंज ज्योत निघाली. त्याच क्षणी ऋद्धिसिद्धीच्या डोळ्यांतूनहि एक तेज बाहेर पडले. ते अतुल तेज एकत्र झाल्यावर, त्यात तेजांतून, त्रैलोक्य आपल्या कांतीनं झळाळून टाकणारी, कमलासनावर बसलेली अशी अत्यंत तेजस्वी कन्या प्रगट झाली. तीच संतोषीमाता.

ऋद्धिसिद्धि यांनी त्या कन्येला मनतेनं जवळ घेतलं. आपणाला बहीण लाभली म्हणून त्या दोन मुलांना अत्यंत समाधान लाभलं. त्या कन्येनं आपल्या त्या दोन भावांना राखी बांधली. सर्वांच्या चित्तवृत्ति त्या प्रसन्न वातावरणांत परमोच्च आनंदानं प्रफुलित्त झाल्या.

नारदनुनि म्हणाले, ‘प्रभो, सर्वांना संतोष देणारी ही संतोषी देवी आहे. ही देवता सर्वांना प्रिय होईल.’

संतोषी माता

गणेश आपल्या त्या कन्येला म्हणाले, ‘देवी संतोषी, तुझी पूजा केली की, सर्व देवतांचे पूजन केल्याचं फळ लाभेल. तुझे स्मरण करतांच. भीति नष्ट होईल. तुझी भक्ति करणाऱ्याला तूं कल्याणकारक बुद्धी दे, त्यांचे दारिद्र्य, दु:ख, पीडा दूर कर. त्यांची संकटे नाहिशी कर. त्यांचे रक्षण कर. सर्वांना ज्ञान,ऐश्वर्य व संपन्नता प्राप्त करुन दे. सर्वांवर उपकार कर. साऱ्या विश्वाचें कल्याण कर. भक्तांच्या सुखासाठी झटणारी, त्यांची सर्व काळजी वाहणारी तूं त्यांची संतोषीमाता आहेस.’

गणेशानं संतोषीमातेला दिव्य शक्ती दिली. तो दिवस शुक्रवारचा होता.

आनंदमयी संतोषीमाता सर्वांना आनंद देऊ लागली. संतोषी मातेवर दृढ श्रद्धा व उत्कट भक्ति करणारे संकटातून तरुन जाऊ लागले. तिच्या कृपेने भक्तांचा उत्कर्ष होऊ लागला. सर्वांना फलप्राप्ती होऊन ऐश्वर्य उपभोगावयास मिळूं लागले.

नारदमुनि संतोषीमातेचें गुणगान करु लागले.

‘संतोषीमातेची भक्ति करणाऱ्या भक्तांना संकट व दारिद्र्य कधीच त्रास देणार नाही. संतोषी मातेच्या आशीर्वादानं भक्तांच्या जीवनांत सुखसमृद्धि प्राप्त होते. सर्वांनी संतोषीमातेचं भक्ति आणि श्रद्धा यांनी युक्त अशा अंत:करणानं चिंतन करा; म्हणजे माता तुमच्या कार्यसिद्धीसाठी प्रयत्न करील. भक्तांचे कल्याण हीचं संतोषीमातेची तळमळ आहे. संतोषी माता आपल्या भक्तांचे चांगले करते. मातेची पूजा, व्रत केल्यानं तुमच्याहि चिंता आणि क्लेश जातील. अगदी तुमच्या मनासारखं सर्व होईल तुमची ऐहिक व परमार्थिक उन्नति होऊन तुम्हालाहि सदोदित सुख मिळेल.’ असं नारदमुनि मनुष्यलोकांत सर्वांना सांगू लागले.

गांजलेल्या- पीडलेल्यांना दिलासा मिळाला. अंधारात धडपडणाऱ्यांना उजेड दिसू लागला. दु:खी दारिद्री माणसांना सुखाचा मार्ग सापडला. बैचेन झालेल्या मनाला संतोषी मातेच्या उपासनेनं समाधानी लाभली. संतोषीमातेची आराधना केल्यानं सर्व इष्ट फळें, सर्व सुखें मिळू लागली. माणसं संतुष्ट होऊ लागली.

संतोषीमातेनं आपल्या भक्तांना सांगून ठेवलें आहे; ‘ भक्तहो, मी तुमच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहीन. संकटकाळी श्रद्धायुक्त मनानं मला शरण येतांच मी प्रगट होऊन तुम्हांला दु:खमुक्त करीन. मी तुमच्यावर प्रसन्न असावें म्हणून प्रत्येक शुक्रवारीं माझे पूजन करावे. माझ्यावर अचल निष्ठा ठेवून कठीण समयी जे माझी करुणा भाकतील त्यांच्या सुखासाठी मी सतत जपत राहीन. जेथे माझे नामस्मरण चालतें, आत्मीयतेनं माझी भक्ती केली जाते तेथे मी नित्य असते.’

संतोषीमातेनं आपल्या भक्तांना तसें आश्वासन देऊन ठेवले. मातेच्या आश्वासनाची लोकांना प्रचिती येऊं लागली.

नारदमुनि संतोषीमातेची थोरवी सर्व देवदेवतांसमोर गाऊं लागले. नंतर ते क्षीरसागरांत देवी लक्ष्मीला संतोषीमातेचा महिना सांगण्यासाठी गेले.

शेषशायी भगवान श्रीविष्णूसमोर बसून लक्ष्मी त्यावेळी त्यांचे पाय चेपीत होती.

भगवान श्रीविष्णु म्हणाले, ‘मुनिवरा, आज आपण कोणत्या कामासाठी आलां आहांत. आपल्या मनांत काय आहे ते आम्हाला सांगा.’

यावर नारदमुनि म्हणाले, ‘हे भगवंता, जगाचं पालनपोषण करणं हे देवी लक्ष्मीचं कार्य. या देवीच्या कृपेमुळं विद्या, शक्ति, संपत्ती प्राप्त होते. म्हणून लोक देवी लक्ष्मीचं पूजन करीत होते. परंतु देवी लक्ष्मीच्या पूजनाची फळे लोकांना मिळेनाशीं झाली आणि त्यामुळं देवी लक्ष्मीवरील लोकांची श्रद्धा ढळत चालली आहे. आतां लोक गणेशकन्या संतोषीमातेची पूजा, व्रत करुं लागले आहेत. गणेशाप्रमाणं संतोषीमातादेखील जनसामान्याची देवता बनली आहे.’

‘संतोषीमातेची उपासना अधिक फलदायी असल्याची लोकांची खात्री झाली म्हणून घरोघरी मनुष्यलोकांत तुम्हाला संतोषीमातेची पूजा, प्रार्थना चाललेली दिसून येईल.’ नारद मुनि म्हणाले.

‘अस्सं!’ भगवान श्रीविष्णु उद्गारले.

‘होय! देवी,’ आपण तर चंचल आहांत. आपण एकाच जागी फार काळ राहात नाही. शिवाय लोकांकडे आपण सुद्धां पाठ केली आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. दु:ख दारिद्र्य, चिंता, पीडा, सर्वांच्या पाठीशी लागली आहे. जेथे पाहावें तेथें निरुत्साह व निराशा पसरलेली आहे. अशा दु:खमय जीवनांत कोणत्या देवतेची आराधना केल्यानं जास्तीत जास्त सुखप्राप्ती होईल याचा विचार लोक करुं लागले. त्यांना संतोषीमातेचं माहात्म्य कळलं. ते मग संतोषी मातेला प्रसन्न करुन घेण्यासाठी तिची मनोभावे पूजा करु लागले. संकटकाळी मातेची भक्ति करुन तिला हाक मारताच ती धावत जाऊ त्यांना त्या संकटातून मुक्त करते. त्यांचे दु:ख दारिद्र्य घालवते. त्यांचं जीवन सुखमय करते. संतोषीमाता आपल्या भक्तांचा मान, सन्मान, प्रतिष्ठा, लौकिक वाढवते. मनुष्यलोकांत आता सर्वांना संतोषीमातेचाच आधार सापडला आहे. ती सर्वांचीच माता बनली आहे.’ नारदमुनीनं अशा तऱ्हेनं संतोषीमातेची स्तुति केली.

संतोषीमातेची भक्ति करतांच माणसांच्या सकल पीडा नाश पावतात.त्यांच्या सर्व आपदा निरसून जातात. त्यांना सर्व संपदांची प्राप्ती होते, हे नारदमुनीकडून तिनं ऐकलं. तिला आनंद झाला. अभिमान वाटला. ‘तो मीच अवतार घेतला आहे’, असं तिनं नारदमुनींना त्यावेळीं सांगितले नाही.

‘भगवंता, माणसांच्या दु:खांचे निरसन करणाऱ्या त्या मातेच्या भेटीसाठी तुम्ही अवश्य जा.’ नारदमुनी म्हणाले.

‘अवश्य! त्यावेळी मी तुम्हालाहि बोलावून घेईन, मुनिवरा.’ भगवान श्रीविष्णु म्हणाले. लक्ष्मी हंसूं लागली.

‘नारायण- नारायण’ असं म्हणत नारदमुनि तिथून निघाले.

‘प्रभो, लोकांच्या सर्व संकटांचा मी अवतार घेऊन परिहार करीन असं जे मी आपणाला आश्वासन दिलं होतं. तें मी पूर्ण केलं आहे.’ लक्ष्मी म्हणाली.

‘होय, तरीसुद्धां तुझी खरोखरच तिथं भक्ति चालली आहे का हे मी प्रत्यक्ष जाऊन पाहणार आहे.’ भगवान श्रीविष्णु म्हणाले.

‘जरुर जाऊन पहा!’ लक्ष्मी उद्धारली.

त्याच दिवशी भगवान विष्णु, शिवशंकर व ब्रम्हदेव यांची भेट झाली. त्या वेळी भगवान विष्णु म्हणाले की, ‘परमसमर्थ, देवाधिदेव. जगदाधार, परमात्मा, सृष्टिकर्ता, सुखकर्ता श्री गणेशाची आम्ही पूजा करतो. परंतु नारदमुनीकडून मला असं समजलं आहे की, मनुष्यलोकांत माणसं संतोषीमाता या गणेशकन्येची पूजा करीत आहेत.’

‘तिथ संतोषीमातेचीच भक्ति चालली आहे का हे आम्हांला प्रत्यक्ष जाऊन पहायला हवं.’ शिवशंकर म्हणाले.

मातेच्या त्या भक्तांची सत्वपरिक्षा आम्हीं का घेऊं नये? ब्रम्हदेव म्हणाले.

‘आपण सर्वांनी आतांच निघूं या.’ भगवान विष्णु म्हणाले.

ज्या दिवशी ते मनुष्यलोकांत उतरले तो दिवस शुक्रवारचा होता. त्या तिघांनीहि वेष पालटला होता. आपले रुप बदलले होते.

ते एका मंदिरात गेले. ते मंदिर संतोषीमातेचे होते. तिथं त्यावेळी एका भक्तानं आपल्या हातातील चणे आणि गूळ मातेच्या मूर्तीसमोर ठेवला आणि मातेला हात जोडून तो प्रार्थना करु लागला.

‘ हे परब्रम्ह, जगत्कल्याणी संतोषीमाते, हे अखिल विश्वात्मिके तूंच जगज्नननी आहेस, तू आनंददायक आहेस. तुझी नयनरम्य मूर्ती सर्वांची स्फूर्तिदायी आहे. तूं परममंगल, शांतिरुप आणि मुक्तीदायी आहेस. तूं साक्षात ब्रम्हज्ञान आहेस. तुला माझं नमन असो. हे माते, तुझें माहात्म्य ऐकणारा निर्भय बनतो. त्यांच कल्याण होते. त्यांचे कुळ आनंद पावते. माते, माझं दु:ख, दारिद्र्य व दैन्य नष्ट व्हावे म्हणून मी तुला आळवीत आहे. हे माते, माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून मी तुझीच भक्ति करीत आहे. हे माते, तूं माझ्यावर दया कर. मला उत्तम आरोग्य दे. विजय दे!’

संतोषी मातेच्या त्या भक्तानं केलेली प्रार्थना ते तिघेजण ऐकत होते. नंतर ते दुसऱ्या घराकडे गेले.

तिथं त्या घरांत एक गृहस्थ संतोषीमातेची प्रार्थना करीत असलेला त्यांच्या दृष्टीस पडला.

तो गृहस्थ म्हणूं लागला, ‘ हे संतोषीमाते, शरणागताच्या मदतीला धावून जाणारी तुझ्याशिवाय दुसरी कोण आहे? हे माते, तुझ्याशिवाय आमच्या व्यथा कुणीही जाणूं शकणार नाही.आम्हाला तुझी उपासना करणं जरुर आहे. हे कृपासिंधु, दयावंत माते, भुकेच्या वेळीच मुलांना जशी आपल्या मातेची आठवण होते; तशी यावेळी आम्हाला तुझी आठवण झाली आहे. तूं आमची सारी संकटे पार लयाला ने.’

प्रार्थना संपल्यावर संतोषीमातेच्या प्रतिमेसमोर ठेवलेला चणे आणि गुळाचा प्रसाद तो गृहस्थ सर्वांस वाटू लागला.

ते पाहून ते तिघेजण थक्क झाले व दुसऱ्या शहरांत गेले. त्या शहरांत एक सुवासिनी संतोषीमातेची प्रार्थना करीत असलेली त्यांनी पाहिली.

‘हे संतोषीमाते, तूं सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ आहेस. तूं मला प्रसन्न हो. माते, माझं सारं आयुष्य तूं सर्वार्थानं संपन्न कर. माझा संसार सोन्याचा कर.’

अशी प्रार्थना करुन त्या सुवासिनीनं चणे आणि गूळ केळीच्या पानांत घेतलेे व ते गाईला खायला दिले.

ते तिघेहि अस्वस्थ बनले. तिथून ते मग दुसऱ्या गावांत गेले. तिथे एका घरांत संतोषीमातेची पूजा चालली होती. त्या ठिकाणीं गावांतील माणसं जमली होती. मातेची पूजा करणाऱ्या त्या भगिनीनं त्या दिवशी उपवास केला होता. समोर संतोषी मातेची प्रतिमा ठेवलेली होती. मातेला तिनं हळदीकुंकू, पुष्पे, वाहिली निरांजनात तूपवात लावली. श्रीफळ ठेवले. तांब्याचा तांबा पाणी भरुन ठेवला. त्यावर आंब्याच्या पांच पानांचा डहाळा घातला.त्यावर ताम्हन ठेवून त्यांत चणे आणि गूळ प्रसाद म्हणून ठेवला. नंतर त्या भगिनीनं संतोषीमातेची आरती गायिली आणि ती प्रार्थना करुं लागली.

‘हे संतोषीमाते, अनन्यभावानं तुला शरण येणाऱ्या भक्तांना तू त्वरित पावतेस. जागृति स्वप्नी तुझेंच चिंतन करणाऱ्या भक्तांना तूं कीर्तिवैभव, धनदौलत प्राप्त करुन देतेस. तू भक्तावर सदा प्रसन्न असावे म्हणून भक्त भावभक्तिनं तुझेंच पूजनअर्चन करुन करुणा भाकतात. हे माते, माझी सारीं विघ्ने, अरिष्टे तूं निवारण कर.’ प्रसन्नतेनं केलेल्या आरतीचा तूं स्वीकार करं.’

नंतर त्या भगिनीनं ताम्हनातील चणे आणि गूळ सर्व जमलेल्या मंडळीला प्रसाद म्हणून वाटला. तांब्यातील पाणी तुळशीच्या मुळांत नेऊन ओतले. त्या तिघांनी ते पाहिले. तिथून ते दुसऱ्या नगरांत गेले.

एका घरात संतोषीमातेच्या सोळा शुक्रवारच्या व्रताचे उद्यापन चाललें होते. त्या पवित्र, मंगल, सात्विक वातावरणानं त्या घरातील सर्व मुलंमाणसं भारावून गेली होती. त्या दिव्य आनंदानं त्या सर्वांना बाहेरील जगाचा विसर पडला होता. पूजा आटोपल्यानंतर त्या महिलेनं सर्वांना चणे आणि गुळाचा प्रसाद वाटला; आणि मग पांच ब्राम्हणांना व एका कुमारिकेला खीरपुरीचे भोजन घातले . ब्राम्हणांना दक्षिणा दिली. त्या कुमारिकेला कापड आणि फुलांची वेणी दिली. नंतर त्या महिलेनं घरातील सर्व मुलामाणसांना मातेच्या प्रतिमेसमोर हात जोडून उभं राहायला सांगितले. ती महिला घरधनीण होती. ती मातेला सांगू लागली. ‘ हे संतोषीमाते, तुझी भक्ति केली तर भक्तांच्या आशा आकांक्षा सफल होतात. सर्व इच्छा पूर्ण होतात. भक्तांना मन: शांति’ मिळते, असा तुझा अपार महिमा आहे. हे माते, तू आमच्यावर निरंतर कृपा कर. आमच्या जीवनात सुख, समृद्धि व शांति प्राप्त करुन दे. तुझी भक्ति आमच्या मनांत चिरंतन वास करो, आणि या घरातील माणसं अशीच एकमेकांशी प्रेमळ असावी. तूं आम्हांला आशीर्वाद हे माते.’ अशी प्रार्थना त्या महिलेनं केल्यावर सर्वांनी ‘संतोषीमाते, नमोस्तुते’ असं एकमुखानं बोलून मातेच्या प्रतिमेवर फुले उधळली; आणि मातेला नमस्कार केला.

त्या तिघांनी हें पाहिलं आणि ते पुढं निघाले. ज्या ज्या घरात संतोषीमातेची पूजा- प्रार्थना चालली होती. तिथं संतोषीमाता येत असल्याचं त्यांनी पाहिलं. ते तिघेही साधू बनून एका घरात भिक्षा मागायला गेले असता त्या घरातील भगिनीनं त्यांच्या हातातील भिक्षापात्रात चणे आणि गुळाचा प्रसाद टाकला. ते पाहून ते चकित झाले.

त्या नगरांतून ते दुसऱ्या नगरांत जात असतां वाटेत त्यांनी काही स्त्रिया पूजासाहित्यानं भरलेली ताटं हातांत घेऊन जात असलेल्या पाहिल्या. त्यांनी त्या स्त्रियांना विचारलं, ‘ तुम्ही कुठं जात आहात?’

‘संतोषी मातेच्या मंदिरात’. आम्ही दर शुक्रवारी संतोषीमातेची पूजा करतों.’ त्या स्त्रियांनी सांगितले.

‘ तुम्ही संतोषीमातेचीच का पूजा करता?’ त्या तिघांनी त्यांना विचारले.

‘माझे पति नोकरीसाठी दूरदेशी गेले होते. बरीच वर्षे त्यांचा पत्ता नव्हता. घरातील माणसं माझा खूप छळ करीत होती. मला जगणं नकोसं झालं होतं. मी खूप दु:ख भोगले. पण अखेर मातेचं व्रत केल्यामुळे माझे मनोरथ पूर्ण झाले. दूरदेशी गेलेले माझे पति सुखरुप परत आले.’ पहिली स्त्री म्हणाली.

‘माझं लग्न होत नव्हतं. परंतु मातेचं व्रत केल्यामुळं माझं लग्न झालं. मला मनपसंत पतिराज मिळाले. मी सुखी बनले.’ दुसरी स्त्री म्हणाली.

‘मला मूल होत नव्हतं, पण मातेच्या कृपाप्रसादानं मला मुलगा झाला.’ तिसरी म्हणाली.

‘मी अत्यंत कष्टी, दरिद्री होते म्हणून मी संतोषीमातेचें व्रत आरंभिले. त्यामुळे माझ्या मनातील चिंता नष्ट झाल्या. मन प्रसन्न झाले. दारिद्र्य गेले. माझे घरधनी बनले.’ चौथी म्हणाली.

Santoshi Mata Katha मराठीतून

मी फार आजारी होते. बरेच दिवस मी अंथरुणावर खिळून होते. मी त्या आजारांतूून बरी होईन असं कुणालाचं वाटलं नव्हतं. नंतर मी संतोषीमातेची पूजा, प्रार्थाना करु लागले. आणि त्या भयंकर आजारांतून बरी झाले.’ पाचवी म्हणाली.

‘आमचे फार मोठे कुटुंब आहे. आमच्या घरांत नेहमीच वितंडवाद, भांडणतंटे होत असायचे. आम्हां नवराबायकोला त्या घरांत खूप त्रास व्हायचा. मी सारखी रडायची नंतर मी मातेची भक्ती करु लागले. त्यामुळं आमचं ते दु:ख दूर झाले. मातेनं आमच्या कुटुंबाची भरभराट केली आहे.’ सहावी स्त्री म्हणाली.

‘संतोषीमातेवर नितांत श्रद्धा ठेवून आम्हीं आमच्या ऐपतीप्रमाणं हे व्रत करीत आहोंत. मातेची पूजा केल्यानंतर सायंकाळी आम्हीं एक वेळचं जेवण करतो. शुक्रवारच्या दिवशी आम्ही आबंट पदार्थांचे सेवन करीत नाही. चणे आणि गूळ मातेचा प्रसाद म्हणून सर्वांना वाटतो. संतोषीमाता ही आमची आईच आहे. संतोषीमाता आमच्या पाठीशीं सदैव उभी आहे. मातेची भक्ति आम्ही कधींच सोडणार नाही.’ ती पहिली स्त्री म्हणाली.

नंतर त्या स्त्रिया मातेच्या मंदिरात निघून गेल्या.

संतोषीमातेच्या त्या भक्तांची सत्वपरीक्षा घेण्याच्या त्या तीन देवांनी मुळीच प्रयत्न केला नाही; कारण त्यांना कळून चुकलें की, संतोषीमाता त्यांच्या रक्षणासाठी धावून आल्याशिवाय राहाणार नाही. मोठमोठ्या अडचणींच्या प्रसंगातून संतोषी मातेच्या व्रतपूजनानं तिचे सारे भक्त तारले जात आहेत. तिच्या आश्रयानं तिच्या भक्तांना शाश्वत असं शांतिसुख मिळत असते; म्हणून ते संतोषीमातेची भक्ती करतात.

भगवान विष्णु, शिवशंकर, ब्रम्हदेव हे तिन्ही देव संतोषी- मातेला भेटायला गेले. नारदमुनि सुद्धा तिथं आले. त्या सर्वांना संतोषीमातेची स्तुति करुन तिचा जयजयकार केला.

संतोषीमातेच्या स्वरुपात नारदमुनींना लक्ष्मी दिसू लागली. नारदमुनि आश्चर्यचकित झाले.

लक्ष्मी म्हणाली, ‘मुनिवरा, मनुष्यलोकांत माणसे अनंत प्रकारची दु:खे भोगीत आहेत. त्यांच्यावर दया करणाऱ्या हेतूनं तुम्ही यांना भेटायला म्हणून आमच्याकडे आला होता. ती दु:खे नष्ट करण्याचा एखादा उपाय शोधून काढायला यांना तुम्ही सांगितले होते. त्याबाबत विचार करुन आपण काहीतरी अवश्य करु असं यांनी कबूल केलं होतं. त्यांच्याकडून मला तें समजताच गणेशाची कन्या म्हणून मी अवतार घेईन व त्या माणसांना सर्व दु:खांतून मुक्त करीन असं मी आश्वासन यांना त्यावेळी दिलं होतं. त्याप्रमाणं मी हा अवतार घेतला. मुनिवरा, संतोषीमाता हा लक्ष्मीचाच अवतार आहे हे मी तुम्हांला आता सांगत आहे. त्या दिवशी तुम्ही संतोषी खूपच स्तुति करीत होता. मी हंसत होते. आजही मी हसतें आहे. माझे भक्तही जीवनात आनंदानं हसत असतात.’

लक्ष्मी हसतच राहिली. नारदमुनि तिच्याकडे पहातच राहिले. लक्ष्मी गुप्त झाली. नारदमुनींना पुन्हा संतोषीमाता दिसू लागली.

‘माणसांचा भाग्योदय करणाऱ्या संतोषीमाते, तुझ्या नांवाचा गजर मनुष्यलोकांत सतत होत राहणार.’ नारदमुनि म्हणाले.

शतकामागून शतकें जात चाललीं. संतोषीमातेची उपासना, आराधना सर्वत्र चालूंच आहे. शुक्रवारचे व्रत लोक भक्तिभावाने करीतच आहेत.

जो कुणी ही संतोषीमातेची कथा प्रेमाने पठण करतील, श्रवण करतील. त्यांची सर्व दु:खे मातेच्या कृपेने दूर होऊन तो सुखी होईल. माता त्यांचे कल्याण करील. santoshi mata katha

FAQ

संतोषी मातेचा इतिहास काय आहे ?

हिंदू पुराणानुसार संतोषी माता हा माँ दुर्गेचा अवतार आहे. या शिवाय संतोषी माता ही भगवान गणेशाची मुलगी असल्याचे देखील म्हटले जाते.पण यात शंका असल्याचे देखील अनेक जण म्हणतात.

संतोषी मातेला आंबटचा नैवेद्य का देऊ नये?

संतोषी मातेला कधीही आंबटचा नैवेद्य दाखवला जात नाही. कारण असे म्हणतात की संतोषी मातेला आंबट गोष्ट आवडत नाही. तिला गूळ आणि चणे हाच नैवेद्य दिला जातो.

संतोषी मातेचा आवडीचा रंग कोणता आहे?

संतोषी मातेचा आवडीचा रंग हा लाल आणि पिवळा आहे. त्यामुळे तिला लाल आणि पिवळ्या रंगाची वस्त्रे आणि फुले अर्पण करु शकता. संतोषी माता कथा (santoshi mata katha) वाचायला विसरु नका.

अधिक वाचा

Savitrichi Katha | वटसावित्री कथा (2023)

KAKAD AARTI | काकड आरती संग्रह मराठी 2023