Savitrichi Katha हिंदू धर्मामध्ये महिलांच्या सणांना विशेष महत्व आहे. विशेषत: सुवासिनी या अत्यंत मनोभावे काही सण साजरे करतात. वटसावित्री किंवा वटपौर्णिमा हा त्यापैकीच एक महत्वाचा सण आहे. पतीच्या दिर्घायुष्यासाठी वटसावित्री केली जाते हे आपण सगळेच जाणतो. परंतु तुम्हाला वटसावित्रीची खरी कथा माहीत आहे का? नाही. तर तुम्हाला वटसावित्रीची कथा जाणून घ्यायला हवी.
या शिवाय तुम्हाला काकड आरतीचा लेखही वाचायला हवा. कारण आम्ही काही खास काकड आरतीचा समावेश यामध्ये केलेला आहे.
वटसावित्रीची कथा | Savitrichi Katha
वटसावित्रीची कथा आहे मद्र देशाची. या देशाचा राजा होता अश्वपती. त्याला एक कन्या होती. जिचे नाव होते सावित्री. ती रुपसंपन्न आणि सद्गुणी अशी मुलगी होती. तिचे लग्नाचे वय झाले. त्यावेळी राजाने तिला तिच्या इच्छेप्रमाणे पती निवडण्याची मुभा दिली. तिला इच्छेप्रमाणे पती निवडण्यास सांगितले. तेव्हा सावित्रीने सत्यवान नावाच्या एका राजपुत्रास निवडून त्याच्याशी विवाह करण्याचे निश्चित केले. सत्यवानाचा पिता हा अंध आणि राज्यभ्रष्ट होता. म्हणूनच आपल्या परिवारासह तो अरण्यात राहात असे.
सत्यवान शूर व रुपवान असला तरी तो अल्पायुषी आहे देवर्षी नारदांना ठाऊक होते. म्हणून राजा अश्वपती आणि नारदमुनींनी तिला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितले. परंतु सावित्रीने त्यास नकार दिला. तिने सांगितले की, ‘मी ज्याला मनापासून वरले आहे त्याच्याहून दुसऱ्या पुरुषाचा मी विचारही करणार नाही.’ असे सावित्रीने निश्चयपूर्व सांगितले व सत्यवानाशीच विवाह केला.
काही काळ लोटल्यावर एके दिवशी सत्यवान लाकडे तोडून आणण्यासाठी रानात गेला. त्यावेळी सावित्रीही त्याच्यासोबत गेली. कारण हा दिवस सत्यवानाचा मृत्यूचा दिवस होता. हे तिला नारदमुनींनी सांगितले होते आणि ते तिला ठाऊक होते.
नेहमीप्रमाणे लाकडे फोडून झाल्यावर अतिश्रमामुळे सत्यवानाला ग्लानी आली. त्यावेळी वडाच्या झाडाखाली तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला.त्याचक्षणी तिथे साक्षात यम सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी आला. सावित्रीने यमाला ओळखले व नम्रपणे नमस्कार केला.सत्यवानाचे प्राण हरुन ज्यावेळी यमदेव जाण्यास निघाला त्यावेळी सावित्री त्याच्या मागे मागे जाऊ लागली.
यमदेवाने सावित्रीची समजूत घातली. तिला माघारी जाण्यास सांगितले. पण त्यावेली सावित्रीने यमाची स्तुती करुन, पतिव्रतेच्या कोमल भावना, तिची पतिनिष्ठा व कर्तव्य यासंबंधी सुसंबद्ध व विद्वत्तापूर्ण विवेचन केले. तिच्या वाक् चातुर्याने यम प्रसन्न झाला आणि त्याने तिला चार वर देऊ केले.
तेव्हा सावित्रीने त्याच्याकडून पहिल्या वराने श्वशुराला अर्थात सासऱ्यांना दृष्टी, दुसऱ्या वराने राज्यप्राप्ती, तिसऱ्या वराने आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ आणि चौथ्या वराने तिने पती सत्यवानाचे प्राण मागून घेतले. अशाप्रकारे पतिव्रताच्या बळावर सावित्रीने पतिकुळाचा व पितृकुळाचा उद्धार केला आणि स्वत:च्या दिव्य, अलौकिक गुणांमुळे ती अजरामर झाली.
ज्यादिवशी ही घटना घडली त्या दिवशीचे हे महत्व लक्षात घेत वटपौर्णिमा सण साजरा केला जातो. वडाच्या झाडाखाली प्राण गेलेल्या सत्यवानाला परत आणण्यासाठी यमालाही आपला निर्णय बदलावा लागला. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी म्हणूनच वटपौर्णिमा साजरी केली जाते.
वटसावित्रीची पूजा
वटपौर्णिमा ही ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा या नावाने देखील ओळखली जाते. या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी वटसावित्रीची पूजा करावयाची असते. त्या दिवशी सकाळीच न्हाऊन स्वच्छ धूतवस्त्रे नेसून सौभाग्यलंकार घालावेत. या दिवशी महिला उपवास धरला जातो. पूजेपूर्वी काहीही खाऊ पिऊ नये अशी पद्धत आहे. शरीर व मन या दिवशी प्रसन्न असावे. पूजेचे सर्व साहित्य तयार करुन योग्य त्या जागी ठेवून द्यावे.
वटसावित्रीची पूजा वडाच्या झाडाजवळ जाऊन त्याच्या बुंध्याशी करणे अधिक चांगले. ते शक्य झाले नाही तर घरात करावी. पूजेसाठी एका पाटावर किंवा चौरंगावर मातीच्या कुंडीत वडाची ताजी टवटवीत फांदी ठेवावी. ती मिळाली नाही तर हळद व गंधाच्या मिश्रणाने पाटावर वटवृक्षाचे चित्र काढावे.
त्याच पाटावर आपल्या उजव्या बाजूस थोड्याशा तांदूळावर गणपती म्हणजे सुपारी ठेवावी आणि डाव्या बाजूस घंटा ठेवावी. एका बाजूला समई लावावी.
पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या इष्टदेवतेला हळदकुंकू वाहून व देवापुढे विडा (विड्याची दोन पाने, त्यावर सुपारी) ठेवून नमस्कार करावा. घरातील वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार घालावा.
वडाला किंवा वडाच्या फांदीला तीन किंवा पाच वेळा प्रदक्षिणा घालून पांढरा दोरा गुंडाळावा. पूजेसाठी पाटावर बसावे. आपल्या पुढ्यात डावीकडून उजवीकडे क्रमाने पाण्याने भरलेला तांब्या, पळीभांडे, ताम्हण आणि पूजासाहित्य नीटपणे लावून ठेवावे. त्यानंतर पूजेला आरंभ करावा.
श्रीवटसावित्रीची आरती
वटपौर्णिमेच्या दिवशी नेमका कसा पूजाविधी असावा हे आपण या आधी जाणून घेतले. वटसावित्रीची कथा जाणून घेतली आता आपण वटसावित्रीची आरती देखील जाणून घेऊया.
अश्वपती पुसता झाला | नारद सांगती तयाला ||
अल्पायुषी सत्यवंत | सावित्रीनें का प्रणीला ||
आणखी वर वरी बाळे | मनीं निश्चय जो केला ||
आरती वडराजा || 1 ||
दयावंत यम दूजा | सत्यवंत ही सावित्री ||
भावें करीन मी पूजा | आरती वडराजा || धृ ||
ज्येष्ठमास त्रयोदशी | करिती पूजन वडाशीं ||
त्रिरात्र व्रत करुनीयां | जिंकी तूं सत्यवंताशी ||
आरती वडराजा || 2 ||
स्वर्गावरी जाऊनीया | अग्निखांब कचळीला ||
धर्मराज उचकला | हत्या घालिल जीवाला ||
येई गे पतिव्रते| पती नेईं गे आपुला ||
आरती वडराजा || 3 ||
जाऊनिया यमापाशीं | मागतसे आपल्या पती ||
चारी वर देऊनियां | दयावंत घावा पती ||
आरती वडराजा || 4 ||
पतिव्रते तुझी कीर्ति | ऐकुनि ज्या नारी येती ||
तुझीं व्रते आचरती | तुझीं भवनें पावती ||
आरती वडराजा || 5 ||
पतिव्रते तुझी स्तुती | त्रिभुवनीं ज्या करिती ||
स्वर्गी पुष्पवृष्टी करुनियां | आणिलासी आपली पती ||
अभय देऊनियां | पतिव्रते करुनियां | आणिलासी आपला पती | अभय देऊनियां ||
प्रतिव्रते तारी त्यासी || आरती वडराजा || 6 ||
FAQ’S
प्रश्न : वटसावित्रीच्या दिवशी कोणता मंत्रोच्चार करावा?
उत्तर : वैष्णवे नम: | मधुसूदनाय नम: | त्रिविक्रमाय नम: | वामनाय नम: | श्रीधराय नम: | ह्रषीकेशाय नम: | पद्मनाभाय नम: | दामोदराय नम: | संकर्षणाय नम: | वासुदेवाय नम: | प्रद्युम्नाय नम: | अनिरुद्धाय नम: | पुरुषोत्तमाय नम: | अधोक्षजाय नम: | नारसिंहाय नम: | अच्युताय नम: | जनार्दनाय नम: | उपेन्द्राय नम: | हरये नम: | श्रीकृष्णाय नम: |
प्रश्न :वडाची पूजा घरी करता येते का?
उत्तर: हो, वर सांगितल्याप्रमाणे घरीच पाटावर वडाचे चित्र काढून त्याची पूजा करता येते. ज्याला वडाची पाने तोडायची नसतील त्यांनी घरीच रांगोळी काढून वडाची मनोभावे पूजा करावी.
अशाप्रकारे ज्या कोणाला वटसावित्रीची पूजा करायची असेल तर ही माहिती तुम्हाला असायला हवी ज्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल.
प्रश्न: वटसावित्रीची पूजा करताना गुरुजींची आवश्यकता असते का?
उत्तर : नाही, वटपौर्णिमा करताना गुरुजींची तशी आवश्यकता नसते. पण हल्ली अनेक ठिकाणी गुरुजी असतात. त्याच्यांकडून तुम्ही योग्य पद्धतीने पूजाविधी करु शकता. शक्य असल्यास तुम्ही वाचून पूजाविधी केला तरीदेखील चालू शकतो.
वटसावित्रीची ही माहिती आवडली असेल तर शेअर करायला अजिबात विसरु नका.