Ramayan Katha | असा झाला वाल्याचा ‘वाल्मिकी’ | रामायण कथासार मराठी -1 आरंभ

Ramayan Katha याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत. संपूर्ण रामायण हे कदाचित सगळ्यांना वाचणे आताच्या काळात शक्य नाही. खूप जणांना वाचनाची तशी आवडही राहिलेली नाही. पण हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा असा धर्मग्रथं अर्थात ‘रामायण’ याची माहिती प्रत्येकाला असायला हवी. आपल्या पुराणात लिहून ठेवलेल्या गोष्टी या गोष्टीच्या का माध्यमातून असे ना लोकांपर्यंत आताच्या नव्या पिढीपर्यंत पोहोचायला हवा. असे आम्हाला वाटते. या कथेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हे सगळे पोहचवणे हेच आमचे उद्दिष्ट्य आहे. Storyus या कथा आपल्या असल्याचा अजिबात दावा करत नाही. या कथा वाचून त्याच या लेखाच्या माध्यमातून आम्ही पोहोचवणार आहोत.

रामायण हे अनेकांनी लिहिले आहे. पण ज्या रामायणाचा अभ्यास अधिक केला जातो ते रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिले आहे. पहिल्या गोष्टीमध्ये ज्यांनी रामायण लिहिले अशा वाल्मिकी ऋषींची कथा जाणून घेणार आहोत. ज्या वाल्मिकी ऋषींनी हे रामायण लिहिले. त्यांनी ते का लिहिले ? असा प्रश्न असेलच ना? त्यांनी ते का लिहिले त्यांची कथा नेमकी काय आहे ते आता आपण जाणून घेऊया.

SWAMI SAMARTH TARAK MANTRA 2023 | श्री स्वामी समर्थ- कथा, तारकमंत्र प्रत्येकाने करावा पाठ

वाल्याचा ‘वाल्मिकी’ झाला (Ramayan Katha-रामायण कथा)

राम नामाचा केला जप

फार वर्षापूर्वींची कथा आहे. वाल्या नावाचा एक दरोडेखोर होता. ब्राम्हणकुळात जन्माला आलेला ब्राम्हण असूनही तो अनाचारी होता. मौजीबंधन होऊनही त्याने त्याचे अध्ययन कधीही केले नाही. ब्राम्हण आचाराचा त्याने त्याग केला होता. चोर, दरोडेखोर, डाकू, खुनी यांच्या संगतीत राहून त्यांचे आचरणही अगदी तसेच होते. संगतीदोषाचा परिणाम असा की तोही दरोडे, खून, चोरी करत असे. आपल्या बायका मुलांसह एका पर्वतप्रदेशात, अरण्यात राहात असे. त्या अरण्यापासून बारा गावांच्या टप्प्यात वाल्याची दहशत पसरलेली होती. अरण्यातून जाणाऱ्या येणाऱ्या यात्रेकरुंना, वाटसरुंना अडवून तो त्यांना लुटत असे. लूटण्यास नकार दिल्यावर तो त्यांचा खून करत असे. त्यांच्याजवळ जे काही असेल ते हिरावून घेत असे. त्याने किती हत्या केल्या याची कोणतीही गणती नव्हती. त्या प्रदेशात वाल्याने मारलेल्या लोकांच्या हाडाचा ढीग पडला होता. वाल्याच्या पापाचे डोंगर हे अगदी मोठे झाले होते. वाल्याचे सारे आयुष्य हे खून, चोरी, दरोडा असे कुकर्म करण्यात गेले होते.

वाल्या म्हातारा झाला. त्याची मुलेही मोठी झाली. पण वाल्याने आपले काम काही सोडले नाही. त्याने खून आणि दरोडे घालणे सुरुच ठेवले होते. एके दिवशी नेहमीप्रमाणे वाल्या हातात शस्त्र घेऊन अरण्यात टपून बसला. यात्रेकरुंची तो वाट पाहात होता. इतक्यात नारदमुनी तेथे आले. त्यांच्याबरोबर अन्यही काही ऋषीमुनी होते. ते सारे तीर्थयात्रेला जात होते. त्यांना पाहताच वाल्या धावत पुढे आला. त्याला पाहून साक्षात यमराज समोर आला असे सगळ्यांना वाटले. वाल्या त्या ऋषीमुनींच्या समोर आला आणि त्यांना अडवून दरडावून म्हणाला,’ थांबा! खबरदार पुढे जाल तर! तुमच्याजवळ जे काही धन असेल ते सारे येथे ठेवा,नाहीतर एकेकाचा मुडदा पाडीन.’

वाल्याने असे दरडाविले असता नारदमुनि पुढे आले व ते वाल्याला म्हणाले- ‘अरे वाल्या, आम्ही निर्धन ऋषीमुनी! आम्ही तीर्थयात्रेला निघालो आहोत. आम्हाला कशाला अडवतोस? तू लोकांचे धन लुटतोस त्याचे काय करतोस? तू या चोऱ्या, माऱ्या खून कोणासाठी करतोस?’
वाल्या म्हणाला, ‘हा माझा धंदाच आहे. माझ्या बायका मुलांसाठी मी हे करतो. त्यांना सुखात ठेवण्यासाठी, मी येणाऱ्या- जाणाऱ्यांचे धन लुटतो. जे बऱ्या बोलाने देत नाहीत त्यांना या कुऱ्हाडीने ठार मारुन मी त्यांचे धन लुटतो. पण हे विचारणारा तू कोण? तुमच्याजवळ जे काही असेल ते येथे काढून ठेवा. नाहीतर तुम्ही मेलात म्हणून समजा!

रामायण कथा- असा झाला वाल्या कोळ्याचा वाल्मिकी (Ramayan Katha)

नारदमुनी हसून म्हणाले,’ अरे वाल्या, आमच्याजवळ जे आहे ते तू खुशाल घे. हवेतर आम्हाला ठार मार. पण मी काय म्हणतो ते अगोदर ऐक! अरे वाल्या, चोऱ्या-माऱ्या करण्यात, खून पाडण्यात तुझे सारे आयुष्य गेले. तू आता म्हातारा झालास. तुझ्या पापांचे डोंगर झाले आहेत. आता तू एक सांग. तू ज्यांच्यासाठी, ज्यांना सुखात ठेवण्यासाठी इतकी पापे केलीस , ती तुझी बायको मुले तुझ्या पापांचे वाटेकरी होतील का? त्यांनी तुझे धन घेतले, पण ते तुझी पापे घेतील का? अरे तुझा मृत्यू जवळ आला आहे. मेल्यानंतर यम तुला दारुण शिक्षा करील. त्या यमयातनांतून तुझी सुटका कोण करणार? अरे, माणसाचे प्रत्येक पापकर्म देवाला दिसत असते आणि त्याचे फळ त्याला मृत्यूनंतर भोगावे लागतात. म्हणूनच म्हणतो तू ज्यांच्यासाठी इतकी पापे केली आहेस, त्यांच्यापैकी कोण कोण तुझ्या पापांचे वाटेकरी होणार आहेत ते विचारुन ये. मग आम्हाला खुशाल ठार मार.’ (Ramayan Katha)

नारदांच्या या बोलण्याचा वाल्यावर परिणाम झाला. संताच्या क्षणिक सहवासामुळे वाल्याची वृत्ती पालटली. नारदांचे म्हणणे त्याला पटू लागले व तो धावतच आपल्या घरी गेला. त्याने आपल्या बायकामुलांना जवळ बोलाविले आणि त्यांना तो म्हणाला,’ आजपर्यंत मी तुमच्यासाठी जे धन आणले ते खून पाडून, दरोडे घालूनच. ते धन तुम्ही आनंदाने घेतलेत. परंतु चोऱ्या, खून करुन माझ्या हातून जी असंख्य पापे झाली आहेत, त्यांचे वाटेकरी तुम्ही व्हाल का? तुमच्यापैकी कौण हे पाप घेईल?

वाल्याचे शब्द ऐकताच त्याची बायको म्हणाली, ‘ आपल्या बायकामुलांचा नीट सांभाळ करणे हे तुमचे कर्तव्यच आहे. त्यासाठी लागणारा पैसा तुम्हीच मिळवायचा तो पैसा कसा मिळवायचा हा तुमचा प्रश्न आहे. आजपर्यंत आमच्यासाठी तुम्ही धन मिळवलेत हे खरे आहे. पण त्यासाठी लोकांचे खून पाडा, दरोडे घाला असे काही आम्ही सांगितले नाही. तुमची पापे तुमच्यापाशी. आम्ही त्यांचे वाटेकरी मुळीच होणार नाही. आम्ही त्यांचे वाटेकरी मुळीच होणार नाही. तुमच्या पापांची फळे तुम्हीच भोगा.’

पत्नीचे हे शब्द ऐकून वाल्याला फारच दु:ख झाले. पश्चातापाने तो पोळून निघाला. तो स्वत:शीच म्हणाला, ‘अरेरे, जन हे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे कोणी नाही! माझा जन्म फुकट गेला. मोठ्या पुण्याईने मिळालेला नरजन्म मी पापाचरणात घालवला. या नरदेहाने भगवत्प्राप्ती करायची सोडून मी पापप्राप्ती केली! दारी आलेल्या कामधेनूने काठीने मारुन घालवू द्यावे किंवा हाती आलेल्या अमृतकुंभ उकिरड्यावर नेऊन ओतावा तसे मी केले!

पश्चातापाने पोळलेला वाल्या परत असरण्यात आला. नारदमुनींच्या पायावर डोके ठेवून शोक करीत म्हणाला,’ मुनिवर्य मला वाचवा. माझ्या पापाचे वाटेकरी होण्यास कोणीही तयार नाहीत. माझा जन्म फुकट गेला. मी तुम्हाला शरण आलो आहे.या पापसागरातून मला फक्त तुम्हीच वाचवू शकता. तुम्हीच माझे धन्वंतरी. माझा भवरोग दूर करा. आता तुम्ही जे सांगाल ते जप-तप- साधन मी करीन.

वाल्याला पश्चाताप झालेला पाहून नारदांना अतिशय आनंद झाला. पश्चातापाशिवाय चित्तशुद्धी होत नाही आणि चित्तशुद्धी झाल्याशिवाय साधना होऊ शकत नाही. बीजारोपण करण्यासाठी जमीन चांगली तयार झाली आहे. हे नारदांच्या लक्षात आले. मग नारदमुनी वाल्याला समजावीत म्हणाले, ‘ वाल्या तू घाबरु नकोस. दु: ख करु नकोस. या भवसागरातून सुटका होण्यासाठी मी तुला एक दिव्य मंत्र देतो. त्याचा तू अखंड जप कर. तो मंत्र अगदी सोपा आहे. ‘राम’ या दोन अक्षरी मंत्राचा तू रात्रंदिवस जप कर, म्हणजे तू सर्व पापांतून मुक्त होशील.’ असे सांगून नारदांनी वाल्याच्या मस्तकावर वरहस्त ठेवून त्याला आशीर्वाद दिला. मग नारदमुनी निघून गेले.

या गोष्टीला कितीतरी वर्षे लोटली. मग एके दिवशी नारदमुनी पुन्हा त्याच ठिकाणी आले. तेथे त्यांना अगदी मंद स्वरात राम! राम! हे शब्द ऐकू आले. आवाज कोठून येत आहे. म्हणून नारदांनी इकडे तिकडे पाहिले. तो त्यांना जवळच एक मोठे वारुळ दिसले. त्या वारुळातूनच ते शब्द ऐकू येत होते. सारा प्रकार नारदांच्या लक्षात आला. त्यांनी खूप वर्षापूर्वीची गोष्ट आठवली. नारदांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी ते वारुळ उकरले. पाहतात तो काय? तो पूर्वीचा वाल्या.! पण आता तो दिव्य तेजाने झळकत होता. तो पूर्ण ध्यानस्थ होता. रामनामाचा अखंड जप चालू होता. इतक्या वर्षात त्याच्या अंगावर वारुळ वाढले, तरी त्याला कशाचेही भान नव्हते. नारदांना अतिशय आनंद झाला. त्यांनी वाल्याला सावध केले. वाल्याने डोळे उघडून नारदांकडे पाहिले. त्याला ओळख पटली आणि त्याने नारदांचे पाय धरले व विचारले, ‘गुरुमाऊली! मी आता पुढे काय करावे? आपली आज्ञा असेल तर मी श्रीरामचरित्रकथा लिहीन’

वाल्याचे ते शब्द ऐकताच नारदांना अत्यानंद झाला. वाल्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून नारद म्हणाले,’आता तू पूर्वीचा वाल्या राहिला नाहीस. आता तू त्रिकालदर्शी महर्षी वाक्मिकी झाला आहेस. आजपासून काही वर्षांनी भगवान विष्णू राजा दशरथाच्या घरी अवतीर्ण होणार आहेत. तोच रामावतार होय. त्याचे तू शतकोटी चरित्र लिही.तू त्या श्री रामाचे जन्म, कर्म, पराक्रम जसे वर्णन करशील, तसेच त्याचे जीवनचरित्र घडेल.’ असा वर देऊन नारदमुनी निधून घेले. (रामायण कथा)

मग वाल्मिकींनी शतकोटी रामायणाची रचना केली. अवघ्या त्रैलोक्याला पावन करणारे हे शतकोटी रामायण कोणी घ्यावयाचे, यावरुन त्रैलोक्यात भांडण सुरु झाले. देव, दानव आणि मानव यांच्यात मोठा झगडा सुरु झाला. शेवटी हे भांडण भगवान शंकरांकडे गेले. त्यांनी रामायणाची समान अशी वाटणी केली. त्यातील दोन अक्षरे शिल्लक राहिली. ते नाव होते ‘राम’ स्वत: शंकरांनी हे नाव आपल्याकडे घेतले. ते राम नाम आपल्या कंठात धारण केले, त्यामुळे त्यांचा हलाहलाचा दाह नाहीसा झाला. त्यांना पूर्ण शांतता, शीतलता प्राप्त झाली असे आहे हे अद्भूत असे ‘राम’ नाम!

या रामनामाने वाल्मिकींचा उद्धार झाला. ब्रम्हादी देव तरुन गेले. शंकराचा दाह नाहीसा झाला. या रामनामाचा महिमा शब्दांनी सांगताच येणार नाही. अमृताची गोडी, आकाशाची विशालता. सूर्याचे तेज शब्दात सांगता येणार नाही. पृथ्वीला उपमा कशाची द्यावी? पाताळाची खोली किती सांगावी? मेरुपर्वताची उंची कोणत्या शब्दांत सांगावी? केवळ अशक्य! रामनामाचा महिमा अमर्याद आहे. शब्दांच्या पलीकडे आहे. (Ramayan Katha)

(रामायण कथा आवडली असेल पण मुलींची नावे हिंदू देवतेंवरुन ठेवायची असतील तर इथे क्लिक करा)

वाल्मिकींनी सांगितलेली ही रामकथा भारद्वाजाच्या मुखातून असंख्य ऋषी ऐकतात.हीच कथा कैलासपर्वतावर शंकरांनी पार्वतीला सांगितली. पाताळलोकात शेषाने ही कथा सर्पकुळाला सांगितली. अगस्तींनी कर्दळीवनात ऋषींना सांगितली. हनुमंताने ती वानरांना सांगितली. हीच कथा ब्रम्हदेवांनी नारदांना सांगितली. तर बदरिकाश्रमात व्यासांनी ऋषिमुनींना सांगितली.

वाल्मिकींनी संस्कृत भाषेत सांगितलेली ही रामकथा श्रीधरस्वामी मराठीत सांगत आहेत. ही कथा प्राकृत भाषेत सांगितली असली तरी त्याचे माहात्म्य अल्पांशांनेही कमी नाही.

सदर कथा ही श्रीरामविजय कथासार (Ramayan Katha) या पुस्तकातील आहे. ही कथा आवडली असेल तर तुमच्या मुलांना नक्की सांगा. रामायण कथा वाचायला आवडतील का? हे देखील कळवा.

अधिक वाचा

SANTOSHI MATA KATHA | संतोषी माता कथा 2023
Savitrichi Katha | वटसावित्री कथा (2023)

1 thought on “Ramayan Katha | असा झाला वाल्याचा ‘वाल्मिकी’ | रामायण कथासार मराठी -1 आरंभ”

Leave a Comment