Chan Chan Gosti | 10 प्रत्येक पालकांनी मुलांना नक्की सांगाव्यात या छान छान गोष्टी

Chan Chan Gosti हल्लीची लहान मुलं मोबाईलशिवाय काहीही करायला पाहात नाही. खाताना, पिताना, झोपताना त्यांना मोबाईलची इतकी सवय लागलेली आहे की, ही मुलं आता आपल्या छान छान गोष्टींपेक्षा परदेशी गाणी- गोष्टी अधिक बोलतात किंवा वाचतात. यात वावगे असे काहीही नाही. पण आपल्या मुलांना आपल्या भाषेचा आदर देखील तितकाच असायला हवा नाही का? तुम्ही तुमच्या लहानपणी वाचलेल्या ऐकलेल्या काही गोष्टी तुम्हाला तुमच्या मुलांना सांगायच्या असतील तर त्यासाठीच आम्ही काही निवडक छान छान आणि छोट्या गोष्टी निवडल्या आहेत. ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील.

LORD SHRI RAM NAMES BOYS 25 + | मर्यादापुरुषोत्तम राम वरुन मुलांची नावे

ससा आणि कासवाची गोष्ट

ससा आणि कासवाची गोष्ट Chan Chan Gosti

एका जंगलात ससा आणि कासव राहात होते. ते दोघे चांगले मित्र होते. एकमेकांसोबत खेळायला त्यांना फार आवडायचे. पण ससा कायम कासवाच्या संथ गतीचा विनोद करत असे. त्याचे कासवाला कायम वाईट वाटे. एक दिवस कासव रागावला. सशाला म्हणाला, तुला तुझ्या वेगाचा फारच जास्त गर्व आहे. पण तुला मी शर्यतीमध्ये अगदी सहज हरवू शकतो.

कासवाचे ते बोलणे ऐकून सशाला हसू आवरेना, तो हसत हसत कासवाला म्हणाला, ‘काहीतरी विनोद करु नकोस. तू मला शर्यतीमध्ये कधीच हरवू शकत नाही.

कासवाने शर्यत अगदी मनावर घेतली होती. त्याने सशाला शर्यत लावण्यास सांगितले. आपण जिंकूच या विचाराने सशाने या शर्यतीला होकार दिला. जंगलातील सगळ्या प्राण्यांना यासाठी आमंत्रण देण्यात आले. त्यानुसार सगळे प्राणी दुसऱ्या दिवशी सकाळी ही शर्यत पाहण्यासाठी हजर राहिले.

जंगलाच्या एका टोकापासून ते समोर दिसणाऱ्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत शर्यत लावायचे ठरले. शर्यतीसाठी कासव आणि ससा उभे राहिले. एक, दोन, तीन म्हणून शर्यत सुरु झाली. पापणी लवते न तोच ससा धुम पळत सुटला. तर कासव मात्र हळुहळू एक एक पाय टाकत चालू लागले. कासवाचा हा वेग पाहता तो काही जिंकेल असे वाटत नव्हते.

कासव धावत शर्यतीच्या मध्यापर्यंत येऊन पोहोचले. त्याने मागे वळून पाहिले तर कासव दूर दूर पर्यंत दिसत नव्हते. त्याने विचार केला की थोडासा आराम करावा. त्यासाठी तो नदीच्या काठी जाऊन पोहोचला. नदीकाठी त्याला छान हिरवेगार गवत आणि गाजरं दिसली. त्याने गवत आणि गाजर खाऊन थोडा आराम करायचे ठरवले. खाल्ल्यामुळे सशाला चांगलीच झोप लागली. कासव मात्र हळुहळू चालत होते. त्याने आपले चालणे कुठेही थांबवले नाही.

संध्याकाळ झाली. सशाला जाग आली. झोपेतून जागे झाल्यावर त्याला शर्यत आठवली. त्याने धूम ठोकली. डोंगराच्या पायथ्याशी तो ज्यावेळी आला त्यावेळी कासव आधीच तेथे येऊन उभे होते. ससा शर्यत हरला होता आणि कासव ही शर्यत जिंकला होता.

सशाला आपली चूक लक्षात आली होती. त्याने आपल्या वेगाचा फारच गर्व केला आणि तो आपल्या लक्ष्यापासून भरकटला. त्यामुळेच त्याला हे अपयश मिळाले होते.

तात्पर्य: कोणत्याही गोष्टीची अति गर्व करु नये. कारण गर्वाचे घर हे नेहमी रिकामेच असते.
कधीही दुसऱ्याला आपल्यापेक्षा कमी समजू नये.

चल रे भोपळ्या टुणूक टुणूक (Chan Chan Gosti)

चल रे भोपळ्या टुणूक टुणूक- chan chan gosti

एक होती म्हातारी. एकदा तिने आपल्या मुलीकडे जाण्याचे ठरवले. मुलीचे गाव होते दूर. त्यासाठी तिला जंगलातून जावे लागणार होते. ती काठी टेकत टेकत मुलीच्या घरी जाण्यासाठी निघाली.

जंगलात पोहोचली. त्यावेळी तिची वाट कोल्ह्याने अडवली. कोल्हा म्हणाला, थांब म्हातारी मी तुला आता खाणार? ती म्हातारी काही घाबरली नाही. ती कोल्ह्याला म्हणाली, ‘मला खाऊन तुला काय फायदा होणार? मी अशी बारीक मला खाऊन तुझे पोट तरी भरेल का? ऐक, मी माझ्या मुलीच्या घरी जाते. तूप रोटी खाते. मस्त जाडजूड होऊन येते मग तू मला खा.’ म्हातारीचे ते म्हणणे कोल्ह्याला पटले. कोल्ह्याने तिला सोडून दिले.

जंगल पार करत असताना तिला वाघ भेटला, वाघ तिला म्हणाला, ‘ म्हातारी थांब, मला खूप भूक लागली आहे मी तुला खाणार., म्हातारी काही घाबरली नाही, शांतपणे म्हणाली, ‘ अरे वाघोबा, तू मला खाऊ नकोस. मला खाऊन तुझी भूक काही भागणार नाही. त्यापेक्षा तू थोडे दिवस वाट पाहा. मी माझ्या मुलीकडे जात आहे. तिथे जाऊन मी मस्त तूप रोटी खाईन जाड जूड होईन मग तू मला खा.’ वाघाला तिचे म्हणणे पटले. वाघाने तिला जाऊ दिले.

म्हातारी खूप दिवस आपल्या मुलीकडे राहिली. तिने चांगला आहार घेतला. तूप रोटी, पंचपक्वान खाल्ली. मुलीकडे खूप दिवस राहून पाहुणचार घेतला. जाडजूड झाली. आता तिची घरी परतण्याची वेळ झाली होती. पण म्हातारीला जंगलाचा प्रवास आठवला. ती घाबरुन गेली. मुलीला म्हणाली, ‘घरी जाताना आता मला कोल्हा आणि वाघ खाणार कारण त्यांना मी जाडजूड होणार असे सांगून आले आहे.आता ते मला खाणार.

मुलीला एक युक्ती सुचली तिने आईला एक मोठा जादूचा भोपळा दिला. तिने त्यात आईला बसवले आणि समजावून सांगितले. म्हातारी जंगलात आली. तिथे वाघ म्हातारीची वाट पाहात बसला होता. भोपळ्यात बसलेल्या म्हातारीला पाहून तो म्हणाला,’ म्हातारे थांब मी तुला खाणार आहे. त्यावर म्हातारी म्हणाली, ‘कोण म्हातारी? चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. हे बोलल्याबरोबर भोपळा पळू लागला. वाघापासून म्हातारीची सुटका झाली.

पुढे तिला भेटला कोल्हा. त्यानेही म्हातारीला थांबवले. तो म्हातारीला खाणार इतक्यात म्हातारी म्हणाली, ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक….. असे म्हणून म्हातारीने धूम ठोकली आणि आपला जीव वाचवला.

तात्पर्य : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते.

प्रामाणिक लाकूडतोड्या

chan chan gosti- प्रामाणिक लाकूडतोड्या

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात एक मेहनती लाकूडतोड्या राहात होता. एकदा जंगलात लाकूड तोडण्याचे काम करत होता. हे झाड नदीकाठी होते. लाकूड तोडता तोडता अचानक त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली. कुऱ्हाड पाण्यात पडल्यामुळे लाकूडतोड्या फार उदास झाला. तो रडू लागला. ‘आता मी काय करु? माझी कुऱ्हाड मी पाण्यातून कशी काढू? ‘

त्याचे रडणे ऐकून त्या नदीतून एक देवी प्रकटली. ती सोन्याची कुऱ्हाड घेऊन बाहेर आली. लाकूडतोड्याला म्हणाली,’बाळा! रडू नकोस ही घे तुझी कुऱ्हाड. सोन्याची कुऱ्हाड पाहून लाकूडतोड्या त्या देवीला म्हणाला,’ ही माझी कुऱ्हाड नाही. मला माझी कुऱ्हाड परत हवी आहे.’

लाकूडतोड्याचे ऐकून देवीने पुन्हा एकदा पाण्यात उडी घेतली. यावेळी ती चांदीची कुऱ्हाड आणली. देवी म्हणाली, ‘लाकूडतोड्या ही घे तुझी कुऱ्हाड!, चांदीची कुऱ्हाड पाहून लाकूडतोड्या म्हणाला,’ही माझी कुऱ्हाड नाही. मला माझीच कुऱ्हाड हवी आहे.

लाकूडतोड्याचे बोलणे ऐकून देवीला आनंद झाला. तिने पाण्यात उडी घेत लाकूडतोड्याची कुऱ्हाड आणली. आपली कुऱ्हाड पाहून लाकूडतोड्याला आनंद झाला. त्याचा तो खरेपणा पाहून देवी प्रसन्न झाली. तिने त्या लाकूडतोड्या सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड भेट दिली.

तात्पर्य: नेहमी खरे बोलावे, त्याचे परिणाम हे अधिक चांगले असतात.

कावळा आणि चिमणीची गोष्ट

एक होता कावळा आणि एक होती चिमणी. चिमणीचं घर होत मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं. चिमणीला आवडायची स्वच्छता त्यामुळे तिचं घर कायम स्वच्छ असायचा. तर कावळा होता फारच आळशी. त्याला कामं करायला आवडायचं नाही तर उलटं तो टिवल्याबावल्या करत इकडे तिकडे फिरायचा. त्यामुळे त्याच घरं हे कायम अस्वच्छ असायचं

एकदा काय झाले, आकाशात ढग साचले. सोसाट्याचा वारा वाहू लागला. अचानक धो-धो पावसाला सुरुवात झाली. कावळ्याचं घरं होतं शेणाचं पाऊस पडताच कावळ्याचं घर वाहून गेलं. पावसात भिजून भिजून कावळ्याला थंडी वाजू लागली. कावळ्याला वाटले शेजारी राहणाऱ्या चिमणीकडे जाऊन आश्रय घ्यावा. तो चिमणीच्या दारावर आला. दार ठोठावू लागला, ‘चिऊताई चिऊताई, दार उघड! आतून चिऊताई म्हणाली, ‘ थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते.

थोड्यावेळाने कावळ्याने पुन्हा एकदा दार ठोठावले. ‘चिऊताई चिऊताई, दार उघड! आतून चिऊताई म्हणाली, ‘ थांब माझ्या बाळाला पावडर लावते.

कावळा पुन्हा थोडावेळा थांबला. काहीवेळाने पुन्हा दार ठोठावू लागला,’चिऊताई चिऊताई, दार उघड! आतून चिऊताई म्हणाली,’ थांब माझ्या बाळाला झोपवते.

बाळाला झोपवून चिऊताईने दार उघडले. तर कावळा पावसात भिजून गेला होता. तो थंडीने कुडकुडत होता. त्याला पाहून चिऊताई म्हणाली,’ तू चुलीपाशी बसं तुला मी गरम गरम खीर खायला देते. चिऊताईने कावळ्याला एक वाटीभर खीर खायला दिली. खीर खाताच कावळ्याच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने चिऊताईला न विचारता चुलीवरील टोपातील सगळी खीर पटापट खाऊन टाकली आणि तो मागचे दार उघडून उडून गेला.

तात्पर्य: लबाड लोकांपासून आपण नेहमी वाचून राहावे.

उंदराची टोपी

उंदराची टोपी

एक होता उंदीर. एकदा फिरता फिरता त्याला मिळाले एक फडके. फडके पाहून त्याला आनंद झाला. या फडक्याचे काय करु असा विचार करुन तो शिंप्याकडे गेला. तो शिंप्याला म्हणाला, शिंपीदादा शिंपीदादा, मला या कपड्याची टोपी शिवून दे. त्याला छान गोंडे लाव. म्हणजे माझी टोपी अधिक सुंदर दिसेल.

शिंप्याने उंदराला त्याला हवी तशी टोपी शिवून दिली. टोपी पाहून उंदीर खूश झाला. त्याने ती टोपी घातली व हातात एक ढोल घेतला. तो गाणे गात गावात फिरु लागला, ‘ राजापेक्षा माझी टोपी छान, ठुम ठुम ठुमाक!. त्याची ही घोषणा राजाच्या कानापर्यंत गेली. राजाला आला खूप राग. त्याने त्याच्या सेवकाला उंदराला पकडून आणण्यासाठी पाठवले. राजाच्या सेवकांनी उंदराला पकडून राजदरबारात आणले.

त्याची टोपी काढून राजाकडे देण्यात आली. हे पाहून चिडलेला उंदिर मोठ्याने म्हणाला, ‘ राजा भिकारी, माझी टोपी घेतली. ठुम ठुम ठुमाक! हे ऐकून राजा खूपच रागावला. त्याने रागाने टोपी उंदराकडे पुन्हा भिरकावली.

स्वार्थी मित्र

स्वार्थी मित्र (छान छान गोष्टी )

एका गावात राम आणि शाम नावाचे दोन मित्र राहात असतात. त्यांची मैत्री चांगली घनिष्ठ असते. एकदा ते जंगलात फिरण्यासाठी जातात. जंगलात गेल्यावर आपल्यासमोर काही संकट आले तर एकमेकांची साथ देऊ असे सांगून ते पुढे प्रवासाला निघतात.

जंगलाच्या मध्यभागी आल्यानंतर त्यांच्यासमोर अस्वल येते. अस्वालाला येताना पाहून राम स्वत:चा बचाव करण्यासाठी झाडावर चढून बसतो. शामला काही केल्या झाडावर चढता येत नाही. त्यामुळे घाबरुन तो जमिनीवर मेल्यासारखा पडून राहतो. अस्वल शामजवळ येते. त्याला हुंगू लागतो. तो बराच वेळ शामजवळ असतो. झाडावर बसलेल्या रामला वाटते की, अस्वल शामच्या कानात काहीतरी सांगत आहे. (Chan Chan Gosti)

अस्वल काही हाती न लागल्याचा विचार करुन तेथून निघून जातो. अस्वलाला जाताना पाहून राम झाडाखाली उतरतो. श्याम जवळ येतो. त्याला विचारतो,’ शाम तुला अस्वलाने कानात काय बरे सांगितले?’

त्यावर शाम सांगतो की, अस्वल म्हणाला की जो अडचणीत कामाला येत नाही अशा मित्रावर कधीही विश्वास ठेवू नकोस.’ रामला आपली चूक कळली. त्याने श्यामची माफी मागितली.

तात्पर्य: संकटकाळी जो मदत करतो तोच खरा मित्र

तहानलेला कावळा

उन्हाळ्याचे दिवस असतात. सगळे पक्षी खूप तहानलेले असतात. पाणी मिळवण्यासाठी त्यांची धडपड चालू असते. एक तहानलेला कावळा देखील पाण्याच्या शोधात वणवण भटकत असतो. अचानक त्याला एके ठिकाणी पाण्याचा घडा दिसतो. पाण्याचा घडा पाहून आनंदीत झालेला कावळा उडून घड्याकडे येतो.

घड्यात वाकून पाहतो. तर घड्याच्या तळाशी त्याला पाणी दिसते. पाणी पिण्यासाठी तो चोच आत घालतो. पण त्याच्या चोचीला पाणी काही लागत नाही. तो बराच प्रयत्न करतो. नंतर त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो. तो आजुबाजूला पाहतो. त्याला बरेच दगडाचे खडे दिसतात. तो एक खडा चोचीने उचलून घड्यात टाकतो. ते टाकताच घड्याचे पाणी थोडे वर येते. त्याला आनंद येतो. तो एक एक करुन घड्यात खडे टाकू लागतो. तोच पाणी वर येऊ लागते. पाणी चोचेला लागेल इतके खडे टाकतो आणि पाणी पिऊन आपली तहान भागवतो. आहे की नाही कावळा हुशार

तात्पर्य : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ

मूर्ख गाढव

गाढवाची फजिती- Chan Chan Gosti

एका गावात एक व्यापारी राहात होता. तो मिठाचा व्यवसाय करी. मिठाचे बोचके गाढवाच्या पाठीवर टाकून तो रोज ते मिठ बाजारात विकून चांगले पैसे कमवत असे. एके दिवशी मिठाचे ओझे गाढवाच्या पाठीवर टाकून तो बाजाराच्या दिशेने निघाला. बाजाराच्या दिशेने जाताना एक लहानसा ओढा पार करावा लागे. एकदा गाढव ते ओझे पार करत असताना त्याचा पाय सटकला आणि तो पाण्यात धापकन पडला. पाण्यात पडल्यामुळे मिठ पाण्यात विरघळले आणि गाढवाच्या पाठीवरचे ओझे हलके झाले. पाण्यातून उठताच गाढवाला अगदी हलके हलके वाटू लागले. त्याला आनंद झाला. पाण्यात पडल्यामुळे पाठीवरचे वजन कमी होते हे त्याला कळाले. पण त्या दिवशी व्यापाराचे खूपच नुकसान झाले. गाढव बिचारे चुकून पाण्यात पडले असे त्याला वाटले.

दुसऱ्या दिवशी पुन्हा व्यापारी गाढवाच्या पाठीवर मिठाची गोणी टाकून बाजाराच्या दिशेने निघाला. पुन्हा गाढव पाण्यात पडले आण सगळे मिठ विरघळले. व्यापाऱ्याचे पुन्हा एकदा नुकसान झाले. गाढव मात्र आनंदी झाले. असे काही दिवस सतत होऊ लागले. पूर्वी कधीही न पडणारे गाढव आता दररोज त्याच ठिकाणी पडत असल्याचे व्यापाऱ्याच्या लक्षात आले. त्याने गाढवाला चांगलीच अद्दल घडवायची असे ठरवले. त्यानुसार त्याने एके दिवशी गाढवाच्या पाठीवर मिठाची गोणी न टाकता कापसाची गोणी टाकली.

गाढव जसे ओढ्याकडे आले तसे त्याने पुन्हा एकदा आपला पाय घसरला असे दाखवले. तो पाण्यात बुडाला. त्याला मनातून आनंद झाला. आज पण आपल्याला काही त्रास होणार नाही असा विचार करुन तो उठू लागला. त्यावेळी त्याला काही उठता येईना. आज त्याच्या पाठीवर मिठ नाही तर कापूस होता हे त्याला काही माहीत नव्हते. कापसात पाणी गेल्यामुळे तो चांगलाच फुगला आणि त्याचे वजन दुप्पटीने वाढले. मग काय गाढवाला कळून चुकले की, आपण केलेली फसवणूक ही व्यापाऱ्याच्या लक्षात आली आहे. त्याला चांगलीच अद्दल घडली.

तात्पर्य: आपल्या कामाशी नेहमी प्रामाणिक राहावे.

मूर्ख डोमकावळा

मूर्ख डोमकावळा- chan chan gosti

एका जंगलात एक गरुड पक्षी राहात असतो. तो धाडसी असतो. एकदा तो गवत चरायला आलेल्या मेंढ्यांपैकी एक पिल्लू उचलून नेतो. त्याचा तो पराक्रम पाहून एका डोमकावळ्याला वाटले जर मी ही असा पराक्रम केला तर सगळ्या पक्ष्यांमध्ये माझा दरारा चांगला राहील. इतर पक्षी गरुडाप्रमाणे मलादेखील घाबरतील.

दुसऱ्या दिवशी चरायला आलेल्या मेंढ्या पाहून त्यापैकी चांगली मोठी मेंढी उचलून नेण्याचा डोमकावळा विचार करतो. तो मेंढी निवडतो आणि उडून तिच्या पाठीवर बसतो. कावळ्याचे वजन आणि मेंढीचे वजन यात असलेल्या फरकामुळे कावळ्याला काहीही करुन मेंढीला हलवताही येत नाही. उलट कावळ्याचेच पाय मेंढीच्या लोकरीत जाऊन अडकतात. त्यामुळे तो तेथून सुटका करण्याचा प्रयत्न करु लागतो. इतक्यात मेंढपाल तेथे येतो. डोमकावळ्याला पाहून त्याला सारा प्रकार लक्षात येतो. तो डोमकावळ्याला मेंढीच्या लोकरीतून सोडवतो आणि पिंजऱ्यात आणून टाकतो.

मेंढपालाची मुलं त्याला विचारतात,’ बाबा बाबा, याला आपण पिंजऱ्यात का अडकवून ठेवले आहे. त्यावर मेंढपाल म्हणतो, ‘ हा मूर्ख डोमकावळा गरुडाची बरोबरी करुन मेंढी पळवून नेण्याचा विचार करत होता. पण स्वत: चे सामर्थ्य विसरुन त्याने ही गोष्ट केल्यामुळे आज पिंजऱ्यात अडकून पडला.

तात्पर्य : कोणाची बरोबरी करण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या गुणांची पारख ठेवावी

माकड आणि मगरीची मैत्री (Chan Chan Gosti)

chan chan gosti- माकड आणि मगरीची मैत्री

एका जंगलात नदीकाठी आंब्याचे झाड होते. त्या आंब्याच्या झाडाला गोड गोड आंब्याची फळं लागतं. एके दिवशी एक माकड आंब्याची फळे खात झाडावर बसला होता. एक मगर अन्नाच्या शोधात शोधात किनाऱ्यावर आले. त्याला खूप भूक लागली होती. झाडावर माकडाला आंबे खाताना पाहून मगर म्हणाले, माकडा माकडा मला खूप भूक लागली आहे. अन्नाच्या शोधात मी इथवरं आलो आहे. पण मला काही सापडले नाही. माकडाने लगेचच झाडावरील आंब्याची फळे काढून मगराला दिली. गोड गोड फळं खाऊन तृप्त झालेला मगर घरी गेला.

माकडासोबत त्याची चांगली मैत्री झाली. तो अधून मधून माकडाला भेटण्यासाठी येऊ लागला. एके दिवशी माकडाने काही फळे मगरीच्या बायकोला पाठवून दिली. मोठ्या आनंदाने ती फळं घेऊन मगर बायकोला म्हणाला, ‘ ही घे फळं तुझ्यासाठी खास माझ्या मित्राने दिली आहेत. मगरीने ती फळं चाखली. तिला आनंद झाला. ती मगराला म्हणाली,’ ही फळं रोज खाणाऱ्या माकडाचे ह्रदय किती गोड असेल नाही का?, मला माकडाचे ह्रदय खायची खूप इच्छा झाली आहे. तुम्ही काहीही करुन मला त्याचे ह्रदय आणून द्या.’

मगरीचा तो हट्ट पुरा करणे मगराला काही केल्या पटत नव्हते. पण मगरीने त्याच्यापुढे असा काही हट्ट केला की, त्याचाही नाईलाज झाला. तो माकडाला आणण्यासाठी निघाला. आंब्याच्या त्या झाडाकडे पोहोचल्यावर त्याला आपला मित्र माकड दिसला. मगराने माकडाला सांगितले, ‘ आज माझ्या बायकोने तुला खास जेवणाचे आमंत्रण दिले आहे. तिने मला तुला घेऊन येण्यासाठी सांगितले आहे. माकड म्हणाला, ‘ पण मी तुझ्यासोबत कसा काय येऊ मला पोहता येत नाही. त्यावर मगर म्हणाला, ‘ तू माझ्या पाठीवर बैस मी तुला माझ्या घरी घेऊन जातो. माकडालाही ते पटले तो लगेच मगराच्या पाठीवर जाऊन बसला.

वाटेत गप्पा मारत असताना मगर म्हणाला, ‘ माझ्या बायकोला तुझे ह्रदय खायचे आहे. त्यासाठी तिने तुला बोलावले आहे.’ हे ऐकून माकड घाबरला पण त्याने ते न दाखवता मगराला सांगितले, अरे देवा पण मी माझं ह्रदय तर त्या झाडावर सोडून आलो आहे. आता तिला ते कसे काय खाता येईल. मगराला काही कळले नाही. तो म्हणाला, आता काय करायचे? माकड म्हणाले, ‘ एक काम करुन आपण पुन्हा त्या झाडाकडे जाऊ माझं ह्रदय घेऊ आणि मग घरी जाऊ.

मगर वळले आणि त्याने माकडाला आंब्याच्या झाडाकडे आणले. किनाऱ्यावर आलो हे पाहून माकडाने झाडावर उडी मारली. सुटकेचा नि:श्वास सोडला. मगराला म्हणाला, तू विश्वासघात केला. मी तुला मदत केली. पण तू तर माझीच शिकार करायला निघाला. तुझी माझी मैत्री संपली. निराश झालेला मगर रिकामी हाताने घरी परतला

तात्पर्य: मैत्रीत कोणाचाही विश्वासघात करु नये

Leave a Comment