Hartalika | हरतालिकेची संपूर्ण माहिती, कथा आणि पूजाविधी | 2023

Hartalika | हिंदू धर्मात हरतालिकेला फारच चांगले महत्व आहे. खास करुन कुमारिका आणि महिला हे व्रत करतात. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे व्रत केले जाते. चांगला पती मिळावा म्हणून कुमारिका आणि अखंड सौभाग्यासाठी महिला हरतालिका व्रत केले जाते. वेगवेगळ्या ठिकाणी हरतालिका करण्याची पद्धत थोडीफार वेगळी असली तरी यात माता पार्वती आणि भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते. परंतु हरतालिकेचे पुराणातील महत्व काय?, पूजाविधी कसा करायचा आणि त्या मागील कथा अशा काही रंजक गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. या शिवाय महालक्ष्मी व्रताची कथा वाचायला, ऐकायला अजिबात विसरु नका.

हरतालिका माहिती

हरतालिका या शब्दाची फोड ‘हरिता’ + ‘लिका’ असे केले जाते. यातील हरिता या शब्दाचा अर्थ जिला नेले आणि लिका हिचा अर्थ सखी असा होतो. पार्वतीला शंकरालाच प्रसन्न करायचे होते. तिने मनोमन पती म्हणून शंकराला आपला पती म्हणून निवडले होते. या शब्दावरुन पार्वतीला हरतालिका असे म्हटले जाते. वटसावित्रीच्या व्रताप्रमाणेच हे देखील कडक असे निर्जला व्रत आहे. ज्या कुमारिका आहेत त्यांना उत्तम पती हवा असेल तर अशांनी हे व्रत अगदी हमखास करायला हवे असे सांगितले जाते. म्हणून हे व्रत विवाहित महिलांसोबत कुमारिका देखील करतात. गणेशोत्सवाच्या आधी येणारा हा महत्वपूर्ण असा सण हिंदूसाठी फारच जास्त महत्वाचा असतो.

2023मध्ये हरतालिका कधी? | Hartalika

यंदाच्या वर्षी अधिक मास आला. अधिक मास माहिती देखील आम्ही आपल्याला दिली आहे. येत्या 19 सप्टेंबरपासून गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. तर त्याच्या आधी एक दिवस म्हणजे 18 सप्टेंबर रोजी हरतालिका येणार आहे. ज्यांना हे व्रत करायचे आहे. त्यांनी या दिवशी व्रत करावे.

हरतालिका पूजा विधी

ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचे असेल, त्या ठिकाणी तोरण बांधावे, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे. पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे. षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी वाचावी. रात्री जागरण करावे. या व्रताने प्राणी पापापासून मुक्त होतो. साता जन्मांचे पातक नाहीसे होते. राज्य मिळते. स्त्रियांचे सौभाग्य वाढते. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावे. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे.

हरतालिका व्रत नियम

हरतालिकेचे व्रत करताना काही नियम पाळणे देखील गरजेचे आहे.

  1. हरतालिका हे व्रत सवाष्ण, कुमारिका,विधवा स्त्री कोणीही करु शकतात.
  2. अखंड सौभाग्यासाठी हरतालिकेचे व्रत केले जाते. त्यामुळे अनेक जण हे व्रत निर्जळा करतात.
  3. पूजेसाठी लाकडाच्या चौरंगावर वाळूचे लिंग स्थापन करावे.

सर्वप्रथम देवी पार्वती, भगवान शिव आणि गणेशजी यांच्या मूर्ती काळ्या ओल्या मातीपासून तयार करा आणि फुलांनी सजवा. या मूर्ती काही काळ सुकू द्या. मुर्ती नसतील तर वाळूचे शिवलिंग बनवा. चौरंगावर पिवळे कापड घालून पूजेची तयारी करा. पिवळ्या कापडावर तीन मूर्ती किंवा वाळूचे शिवलिंग असावे. त्यानंतर चौरंगावर उजव्या हाताला तांदळापासून अष्टकमल तयार करा आणि त्यावर कलश ठेवा. आता कलश वर स्वस्तिक बनवा आणि कलश मध्ये पाणी भरा आणि त्यात सुपारी, नाणे आणि हळद घाला. मूर्तींचा विधीवत अभिषेक करावा आणि त्यानंतर देवी पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात. हरतालिका व्रतादरम्यान १६ श्रृंगाराचे विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी स्त्रिया हातावर मेंहेदीही लावतात, जी सौभाग्याची निशाणी मानली जाते. कुमारिकेने इच्छितत वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. दिवसभर कडक उपवास करावा. शक्य नसल्यास फलाहार करावा.

हरतालिका पौराणिक कथा

सगळ्या व्रतांमध्ये श्रेष्ठ असे व्रत म्हणून हरतालिका व्रताची ओळख आहे. या संदर्भात एक कथा सांगितली जाते ती कथा देखील आज आपण जाणून घेणार आहोत.

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. शंकर-पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. त्यावेळी पार्वतीने शंकराला विचारले, स्वामी सर्व व्रतात चांगले व्रत कोणते? असे व्रत सांगा ज्यासाठी श्रम थोडे आणि फळ पुष्कळ मिळेल. शिवाय मी कोणत्या पुण्याने तुम्हाला वरु शकले हे ही मला सांगा. त्यावेळी शंकर म्हणाले की, नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. असे हे श्रेष्ठ व्रत ऐक.

हरतालिका कथा Hartalika katha

हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावे. ते पूर्वी तू कसे केलेस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केलेस. चौसष्ट वर्षं तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दु:ख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दु:ख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी? अशी ‍त्याला चिंता पडली. इतक्यात तिथे नारदमुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहेत ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविले आहे म्हणून इथे मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली.

नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असे पाहून तुझ्या सखीने रागावण्याचे कारण विचारले, तेव्हा तू सांगितलेस, महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही, असा माझा निश्चय आहे, असे असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे, याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेले. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथे माझे लिंग पार्वतीसह स्थापन केलेस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलेस. त्या पुण्याने इथले माझे आसन हालले. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितला तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावे, याशिवाय दुसरी इच्छा नाही! नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो.

पुढे दुसर्‍या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याच पारण केलेस. इतक्यात तुझा बाप तिथं आला: त्याने तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढे त्याने तुला मलाच देण्याचे वचन दिले. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असे म्हणतात.

हरतालिकेची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.

हेही वाचा

PREGNANCY MISUNDERSTANDING 5+| प्रेग्नंसी समज-गैरसमज

Leave a Comment