Ramayan Katha मधील दुसरी कथा ही रामायण घडवण्यासाठी कारणीभूत असलेल्या रावणाची कथा आहे. दशानन अशी ओळख असलेल्या रावणाला दहा तोंडे होती. तो भगवान शिवाचा भक्त होता. भगवान शंकराची उपासना अगदी न चुकता तो करत असे. राक्षसकुळात जन्माला येऊनही त्याची शिवाची भक्ती ही नक्कीच वाखाणण्यासारखी होती. त्याने देवांना अनेक वर्ष त्रास दिला. त्याला ब्रम्हदेवाकडून मिळालेला आशीर्वाद त्यामुळे तो अधिकच उन्मत्त झाला होता. त्याचा संहार करण्याठी प्रभू रामांचा जन्म होणार हे समस्त देवांना माहीत होते. तसेच ते रावणालाही माहीत होते. त्याने राम जन्मात अनेक विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. परंतु अनिष्टाचा नाश हा शेवटी होतोच. रामायण अनेकांनी लिहिले पण त्यात वाल्मिकी ऋषींचे नाव अगदी आवर्जून घेतले जाते. या आधी आपण वाल्याचा ‘वाल्मिकी’ कसा झाला ही गोष्ट जाणून घेतली आहे. आता राक्षसकुळात रावणाचा जन्म कसा झाला हे जाणून घेऊया. (Ramayan Katha) रावण जन्म
रावण जन्माची कथा Ramayan Katha
ही गोष्ट आहे फारच प्राचीन काळातील. ब्रम्हदेवांनी पुलस्ती नावाचा पुत्र झाला. तो फारच महातपस्वी, सूर्यासारखा तेजस्वी होता. चार वेद त्याला मुखोद्गत होते. त्याचा विवाह तृणविंदूची कन्या देववर्णी हिच्याशी झाला. तिच्यापासून त्याला विश्रवा नावाचा मुलगा झाला. त्याला भारद्वजाची मुलगी दिली. त्यांना कुबेर नावाचा मुलगा झाला. विश्रव्याचा मुलगा म्हणून त्याला ‘वैश्रवण’ असे म्हणतात. त्याने कठोर अशी तपश्चर्या करुन ब्रम्हदेवांना प्रसन्न केले. ब्रम्हदेवांनी त्याला पुष्पकविमान आणि सागरातील लंकेचे राज्य दिले. ही लंका पूर्वी ब्रम्हदेवांनीच निर्माण केली होती. ती दानवांनी बळकाविली. नंतर ब्रम्हदेवांनी ती परत मिळवून कुबेराला दिली. (Ramayan katha)
त्यावेळी पाताळलोकात सुमाळी नावाचा एक दैत्य राहात होता. एकदा पृथ्वीतलावर ब्राम्हणाचा वेष धारण करुन तो आला. त्यावेळी त्याने आपल्या लंकेत दुसराच कोणीतरी राज्य करतोय हे पाहिले. हे पाहून त्यांना आधी खूप आश्चर्य वाटले. लंकेवर कुबेर राज्य करत आहे हे पाहून त्याने विचार केला की, ‘ कुबेरच्या पित्याला जर आपली मुलगी दिली तर लंका मिळवणे फारच सोपे जाईल.’ (Ramayan Katha)
असा विचार करुन तो दैत्य ब्राम्हणवेषात विश्रव्याकडे गेला आणि म्हणाला,’ मी एक दरिद्री ब्राम्हण आहे. मला एकुलती एक सुंदर कन्या आहे. तिचा आपण स्वीकार करावा.’ विश्रव्याला या मागील कोणतेही कटकारस्थान समजले नाही. त्याने सुमाळीची विनंती मान्य केली. मग तो दैत्य सुमाळी आपली कन्या कैकसी विश्रव्याला देऊन पाताळलोकात निघून गेला.
एकदा सूर्यास्ताच्यावेळी कैकसीने विश्रव्याकडे शरीरसुखाची मागणी केली. सूर्यास्ताची वेळ ही संध्या- वदनाची वेळ असते. असे असूनही कैकसीने अशी मागणी करणे विश्रव्याला पटले नाही. तो संतापला त्याने कैकसीची इच्छा पूर्ण केली. कारण त्याला बालहत्येचे पाप ओढून घ्यायचे नव्हते. परंतु त्याने कैकसीला श्राप दिला, ‘ तू महातामसी, पापिणी आहेस. तुझ्या पोटी ब्रम्हराक्षस जन्माला येईल.’ विश्रव्याची शापवाणी ऐकून कैकसीने विश्रव्याचे पाय धरले. मला एक तरी सुपूत्र द्या अशी मागणी केली. विश्रव्याने ‘तथास्तु’ म्हटले. (Ramayan Katha)
काही दिवसांनी कैकसली रावण व कुंभकर्ण नावाची दोन मुले जन्माला आली. तर तिसरा मुलगा बिभीषण ही जन्मला. पित्याच्या वरामुळे तिसरा मुलगा हा साधुपुरुष म्हणून जन्माला आला. त्राटिका आणि शूर्पणखा या रावण आदींच्या दोन बहीणी. पण या सगळ्यात एकच देवभक्त होता तो म्हणजे बिभीषण. (रावण जन्म)
एकदा रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण हे गोकर्णक्षेत्री अनुष्ठान करायला बसले. रावणाने शंकराची आराधना केली. कुंभकर्णाने ब्रम्हदेवांची आणि विभीषणाने भगवान विष्णूंची आराधना केली. ब्रम्हदेवांनी प्रसन्न होऊन तिघांनाही वर दिले. रावणाने वर मागितला. इंद्रादी सर्व देवांना मी बंदिशाळेत घालीन. सर्वांना माझ्या आज्ञा मान्य कराव्या लागतील. मला सर्व प्रकारची संपत्ती, संतती, विद्या आणि धन प्राप्त व्हावे. मी सर्व कलांमध्ये प्रवीण व्हावे.’ रावणाने मागितलेला वर हा देवांना घाबरवणारा होता. त्यानंतर कुंभकर्णाची वर मागण्याची वेळ आली. त्यावेळी घाबरलेल्या देवांनी देवी सरस्वतीला विनंती केली. कुंभकर्णाच्या जीभेवर जाऊन त्यांनी भ्रम निर्माण करावा असे सांगितले. त्यानुसार सरस्वीने कुंभकर्णाच्या बुद्धीत भ्रम केला.
ब्रम्हदेवाने कुंभकर्णाला वर मागण्यास सांगितले,’ मला अखंड निद्रा द्या.’ ब्रम्हदेवाने ‘तथास्तु’ म्हटले आणि कुंभकर्ण मेल्यासारखा झोपी गेला. त्याचे सारे ज्ञान नष्ट झाले. निद्रा म्हणजे मूर्तिमंत अज्ञान, निद्रा माणसाचे सारे काही नष्ट करते. इथेतर अखंड निद्रा मागितल्यामुळे कुंभकर्ण कधीही उठणार नव्हता. कुंभकर्ण रात्रंदिवस निद्रासागरात बुडून गेला. जागे होण्याचे भान त्याला राहिले नाही. कुंभकर्णाची ती अवस्था पाहून विश्रव्याला फार दु:ख झाले त्याने ब्रम्हदेवांना प्रार्थना केली ,’ कुंभकर्णाला सहा महिन्यानंतर एक दिवस तरी जाग यावी. जेणेकरुन तो एक दिवस तरी सर्व सुखांचा अनुभव घेईल. ब्रम्हदेवांनी तथास्तु म्हणून ती मागणी पूर्ण केली.
विभीषणाला ब्रम्हदेवांनी वर मागण्यास सांगितला,’ प्रभो, मला साधुसंताचा सहवास घडावा. माझ्या कडून वेद, पुराणे, शास्त्रे श्रवण व्हावीत. माझ्या ठिकाणी दया,क्षमा, शांती हे सदगुण निर्माण व्हावेत. माझ्याकडून कुणाचाही मत्सर, द्वेष होऊ नये.माझ्या हातून भगवान विष्णूंचे चिंतन व्हावे.’
बिभीशणाची इच्छा ऐकून ब्रम्हदेवांना खूप आनंद झाला, ‘ बिभीषण खरोखऱ धन्य होय. रामाचे जे उपासक असतात त्यांची ही लक्षणे आहेत.’ मग ब्रम्हदेवाने विभीशणाला सांगितले की, तुला रघुनंदन श्रीराम नक्की भेटेल. तो तुला चिरंजीवपद देईल.’ हे सांगून ब्रम्हदेव निघून गेले.
ब्रम्हदेवांनी दिलेल्या वरामुळे रावण मात्र उन्मत्त झाला. त्याने राक्षस गोळा करुन देवांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्याने लंकेवर स्वारी केली आणि कुबेरावर हल्ला केला. कुबेर काही केल्या हरेना. हे लक्षात आल्यावर कपटी रावणाने पित्याच्या नावाने पत्र पाठवून रावणाला संपूर्ण राज्य देण्यास सांगितले. कुबेराने वडिलांचा आदेश मानून रावणाला लंका दिली. त्या दिवसापासून रावण लंकापती झाला. आपल्या पुष्पक विमानात बसून कुबेर ब्रम्हदेवांकडे गेला. त्यांनी कुबेराला मेरु पर्वताच्या पठारावर अलकानगरी निर्माण करुन दिली तेथील राज्य त्याला दिले. (Ramayan Katha)
रावण लंकेचा राजा झाल्यावर सगळीकडे हाहाकार माजला. तो राजा झाला हे कळताच मयासुराने आपली कन्या मंदोदरी रावणाला दिली. बळीची नात दीर्घज्वाळा – कुंभकर्णाचा विवाह झाला. गंधर्वकन्या सरमा बिभीषणाची पत्नी झाली. रावण राजा झाल्यामुळे सगळे देव, मनुष्य, राजा भयभीत होऊन गेले. ते सगळे रावणाला शरण आले. रावणाने ब्राम्हणांनाही सोडले नाही. पृथ्वीवर सगळे रावणाच्या जाचाने त्रासले होते. त्यावेळी त्याचा सावत्र भाऊ कुबेर याने च्याला निरोप पाठवला. ‘तू ऋषिपुत्र आहेस. तू ब्राम्हणांचा छळ करणे योग्य नाही. तू विचाराने वाग. अविचार सोड. अहंकाराला बाजूला कर.’ हा निरोप ऐकून रावण अधिकच संतापला आणि त्याने कुबेरावर पुन्हा हल्ला केला. त्याची सारी संपत्ती, पुष्पक विमान हिरावून घेतले. कुबेर इंद्रदेवाकडे आश्रयाला गेला. तेथे खजिन्यावर तो राहिला. (Ramayan Katha)
रावणाचा मृत्यू अटळ (Ravana Janma)
रावणाला मेघनाद नावाचा पहिला मुलगा झाला. त्यानंतर त्याला एक लक्ष पुत्र झाले. सव्वा लक्ष नातवंडे. त्याचा परिवार मोठा झाला. अठरा अक्षौहिणी इतके त्याचे सैन्य झाले. त्याच्या वाढत्या सैन्यामुळे लोकं त्याला चांगलेच घाबरत असे. त्याला अनेक राजे शरण आले. इतकेच काय तर पर्वत रावणाला शरण गेले. तेव्हा रावणाने पर्वतांना हत्ती केले. उन्मत्त झालेले ते हत्ती पृथ्वीवर धिंगाणा घालू लागले. त्यामुळे पृथ्वीचा थरकाप उडाला. रावणाने इंद्रावर आक्रमण केले. मेघनादाने इंद्राचा पराभव करुन त्याला बांधून आणले. म्हणूनत त्याला ‘इंद्रजित’ असे नाव पडले. सर्व देवांचा रावणाने पराभव केला. त्यांना लंकेत आणून कारागृहात डांबून ठेवले. ते सर्व रावणाची सेवाचाकरी करु लागले.
भगवान शंकराच्या कृपेमुळे रावणाला दहा तोंडे व वीस हात प्राप्त झाले होते. एकदा रावण पुष्पक विमानात बसून शंकराची भेट घेण्यासाठी कैलासपर्वतावर गेला. त्यावेळी दारात असलेल्या नंदीने त्याला अडविले. रावण त्याला न जुमानता पुढे जाऊ लागला. क्रुद्ध झालेल्या नंदीने रावणाला श्राप दिला, ‘ तुला युद्धात वानर ठार मारतील. तू दहा रुद्रांची पूजा केली असलीस तरी अकरावा रुद्र मारुती म्हणून अवतार धारण करील. तो तुझे गर्वहरण करील.’ नंदीचे हे शब्द ऐकून रावण अधिक चिडला तो त्याला म्हणाला, ‘ अरे मूर्खा, तू मला काय समजलास? मी हा कैलास पर्वतच उखडून टाकीन. हा पर्वत उचलून मी लंकेला नेईन.असे म्हणत त्याने कैलास पर्वत उचलण्यासाठी हात घातले. हे लक्षात येताच भगवान शंकरांनी पायाखाली पर्वत दडपला. त्यामुळे रावण आक्रोश करु लागला. मग त्याने शंकराचे स्तवन केले त्यामुळे शंकर प्रसन्न झाले त्यांनी रावणाला मुक्त केले. रावण लंकेत परत आला.
50 +NAMES OF MAHADEV | भगवान शिववरुन मुलांची नावे
सहस्त्रार्जुनाने केले बंदी
एकदा नदीकाठी रावण ध्यान करीत बसला होता. त्याच्यापुढे शंकराचे वालुकालिंग होते. त्याचवेळी नदीच्या काळावर खालच्या बाजूला सहस्त्रार्जुन जलक्रीडा करत होता. त्याने आपल्या हाताने नदीचे पाणी अडवले. त्यामुळे रावणाच्या गळ्यापर्यंत पाणी आले. रावणाला अतिशय राग आला. तो धावतच सहस्त्रार्जुनाजवळ पोहोचला. त्याला विचारले, कोण रे तू? तू नदीचे पाणी का अडवले आहेस? तेव्हा सिंहाने हत्तीला पकडावे तसे सहस्त्रार्जुनाने रावणाची मान पकडली. रावण कासावीस झाला. सहस्त्रार्जुनाने त्याला बंदिवासात टाकले. सहस्त्रार्जुनाला विनंती करुन रावणाला सोडवून आणले.
बळीने घडवली अद्दल
एकदा रावण बळीच्या राज्यात गेला. त्या बळीच्या महाद्वारावर एक अंत्यत तेजस्वी असा दंडाधारी पुरुष उभा होता. तो पुरुष म्हणजे भगवान विष्णू हे त्याला काही कळले नाही. त्याने उन्मत्तपणे बळीला बोलावून आणण्याचा आदेश दिला. तेव्हा विष्णू म्हणाले,’ तुला बळीचे सामर्थ्य माहीत नाही. म्हणून तू असे बोलतो आहेस. आताच तुला खात्री पटेल. तू आत जा म्हणजे तुला ते भेटेल. रावण आत गेला त्यावेळी बळी हा राजसभेत बसला होता. रावण त्याच्यापुढे गेला आणि म्हणाला, ‘मला तुझ्याशी युद्ध करायचे आहे. चल हो तयार! बोकडाने वाघास पकडावयास जावे, बैलाने सिंहावर हल्ला करावा, काजव्याने सूर्यावर चाल करुन जावे त्याप्रमाणे बळी कोणतीही माहिती नसताना बळीवर धावून गेला. सरस्वतीपुढे मतिमंदाने भाषण करावे, त्याप्रमाणे रावण बळीपुढे आपला मोठेपणा सांगू लागला. त्याची ती वटवट ऐकून बळी हसून म्हणाला, ‘माझा द्वारपाल असलेल्या या विष्णूने पूर्वी भक्त प्रल्हादाचे प्राण वाचवण्यासाठी नरसिंहरुप धारण केले होते. त्याच्या तडाख्याने हिरण्यकश्यपूची कर्णभूषणे व कुंडले गळून पडली आहेत. ती प्रथम उचलून घे.’ बळीने असे सांगताच रावणाने आपली सारी शक्ती एकवटून ती कर्णभूषणे उचलण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ती काही उचलता आली नाही. (Ravan janma)
त्यावेळी बळीची राणी विंध्यावली सारिपाट खेळत होती. खेळताना फासा उडाला. तेव्हा बळी रावणाला म्हणाला, ‘तेवढा फासा उचलून आण.’ रावणाला तो फासा काही उचलता आला नाही. त्यावर राणी मोठ्यांदा हसली,’ काय याचे हे सामर्थ्य! आणि याने सगळ्या देवांना बंदी केले म्हणे. याला तर साधा फासाही उचलता येत नाही.’ रावणाला हा अपमान चांगलाच झोंबला. तो आला तसा परत निघाला. त्यावेळी वाटेत बळीच्या सेवकांनी रावणाला अडवून त्याला नागवे करुन त्याची धिंड काढली. त्याच्या अंगावर माती उडवली. त्याला जितका त्रास देता येईल तितका त्रास देण्यात आला. तो तहान- भुकेने कासावीस झाला. त्याला बळीच्या दासीने काखोटीला मारुन आणले. रावणाची ही अवस्था पाहून राजा विश्रवा बळीला शरण गेला. त्याच्या सुटकेची मागणी करु लागला. त्याने रावणाला सोडून दिले. पण तरीही रावणाचा अहंकार काही गेला नव्हता. मी एक दिवस त्या बळीला जिंकल्याशिवाय राहणार नाही. त्या वालीचा पराभव करीन.’ (Ramayan katha)
वाली एकदा समुद्रावर ध्यान करीत बसला होता. तेव्हा रावण त्याला पकडण्यासाठी गेला. वाली सावध झाला. रावण त्याच्याशी युद्धाची भाषा करु लागला. त्यावेळी वालीने त्याला एका झटक्यात आपल्या काखेत आपटले. वाली चारी समुद्राचे स्नान करुन किष्किंधेला पकत आला. त्याने त्या रावणाला अंगदाच्या पाळण्यास बांधले. अंगदला ते खेळणे वाटले. तो त्या सोबत खेळू लागला. त्याला त्रास देऊ लागला. रावणाची ही दशा पाहून विश्रवा वालीला विनवणी करु लागला. त्याने प्रार्थना केली असता वालीने रावणाला लंकेत फेकून दिले. (Ramayan Katha)
माझा मृत्यू कोणाच्या हातात?
एकदा रावणाने ब्रम्हदेवांनी विचारले,’मला मृत्यू कोणाच्या हातून येईल? कृपा करुन खरे काय ते सांगावे.’
ब्रम्हदेव म्हणाले,’ अज राजाचा पुत्र दशरथ नावाचा अयोध्येचा राजा आहे. त्याला श्रीराम नावाचा पुत्र होईल. त्याच्या हातून तुझा मृत्यू होईल.’
हे ऐकताच रावणाने प्रतिज्ञा केली, ‘ मी त्या दशरथालाच मारुन टाकीन म्हणजे मला मृत्यूच येणार नाही. याच वेळ अज राजाने त्याचा पुत्र राजा दशरथ याचा विवाह कौसल्याशी करण्याचे निश्चित केले होते. एके दिवशी नारदमुनी अज राजाकडे आले आणि म्हणाले. ‘मी तुला सावध करण्यासाठी आलो आहे. दशरथ आणि कौसल्या यांची नीट काळजी घे.’ लग्न समारंभात विघ्न घालण्यासाठी रावण येणार आहे.’ नारदांनी हे सांगितले असता अज राजाने दशरश- कौसल्या यांचा विवाह जहाजावर करण्याचे योजिले. रावणाला हे समजताच त्याने मध्यरात्री राक्षसांना घेऊन जहाजावर हल्ला केला. जहाजाचे तुकडे तुकडे केले. लग्नासाठी आलेले वऱ्हाडी पाण्यात बुडाले. कौसल्येला पकडून त्याने एका पेटीत घातले. ती पेटी घेऊन तो आनंदात लंकेला आला. तेथे एका माशाला पेटी देऊन ही पेटी लपवण्यास सांगितले. माशानेही रावणाची आज्ञा पाळून ती पेटी समुद्राच्या बेटावर लपून ठेवली. (Ramayan Katha)
आता कसले लग्न आणि कसला मृत्यू? रावण आनंदात होता. त्या अपघातातून राजा दशरथ बचावला. तो कसाबसा किनाऱ्यावर आला. पण म्हणतात ना, ज्याच्या घरी प्रभू श्रीरामाचा जन्म होणार आहे त्यावर संकंट आले तरी ते किती काळ टिकेल? दशरथ समुद्रातून बाहेर आला. त्या बेटावरच ती पेटी होती. त्याने ती पेटी उघडली तो त्याला त्यात कौसल्या दिसली. दशरथाला आनंद झाला. त्यावेळी तेथे नारदमुनी प्रकटले त्यांनी दशरथ आणि कौसल्या यांचा विवाह लावला. नव दांम्पत्याला आशीर्वाद दिला. नारदमुनी म्हणाले,’ तुमच्या पोटी भगवान विष्णूचा अवतार जन्म घेणार आहे. तुम्ही कसलीही काळजी करु नका. असे सांगून त्या दोघांना पेटीत बंद करुन नारदमुनी निघून गेले. (Ravan Janma)
इकडे लंकेत आनंदीआनंद होता. कारण रावणाने या लग्नात विघ्न आणून आपला मृत्यू टाळला होता. पण त्याला जे झाले त्याची माहिती नव्हती. तो ब्रम्हदेवांना म्हणाला, ‘तुमची भविष्यवाणी साफ खोटी आहे. मी दशरथाचे जहाज फोडून टाकले. कौसल्येला पळवून आणले. त्यावर ब्रम्हदेव स्मित करत म्हणाले,’ अरे मघाशीच दशरथ आणि कौसल्येचा विवाह पार पडला. अरे रावणा ब्रम्हदेवाचे वचन कधीही खोटे ठरणार नाही.
रावण म्हणाला,’ तुम्ही म्हणता त्याप्रमाणे दशरथाचे लग्न झाले असेल तर मी तुम्ही म्हणाल ते देईन.असे बोलून रावणाने ती पेटी सभेत आणली. ती पेटी उघडली तो काय त्यात राजा दशरथ आणि राणी कौसल्या होती. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. रावण ब्रम्हदेवांना म्हणाला, ‘तुमचे वचन खरे ठरले पण आता या दोघांना मी इथेच संपवतो. त्यासाठी त्याने शस्त्र उगारले. कौसल्या घाबरली पण दशरथाने तिला घाबरु नकोस. मी सूर्यवंशातील महावीर आहे. हा माझे काहीही करु शकणार नाही. मी याची दहा तोंडे तोडीन. रावणाने उगारलेले शस्त्र ब्रम्हदेवाने पकडले. त्याने ठरल्याप्रमाणे त्याच्याकडून दशरथ आणि कौसल्येला मागितले. रावणाने वचन दिले होते. राणी मंदोदरीने त्याची आठवण करुन दिली. त्यामुळे दशरथ आणि कौसल्येला घेऊन ब्रम्हदेव अयोध्येला आले. सगळीकडे आनंदीआनंद झाला. ब्रम्हदेव आणि देवीदी देव इंद्र यांनी दशरथाला राजसिंहासनावर बसवले आणि स्वस्थळी गेले.
तुझ्या शरीराचे तुकडे होतील
एकदा रावण पुष्पक विमानातून जात असताना त्याची नजर एका देवांगनेवर पडली. तिचे रुप पाहून तो कामातुर झाला. त्याने तिचा हात पकडला व तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने ब्रम्हदेवाकडे जाऊन सारा प्रकार सांगितला. तेव्हा ब्रम्हदेवांनी रावणाला शाप दिला,’ जर तू परस्त्रीवर बलात्कार केलास तर तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे होतील. यामुळे रावण पुढे जाऊन माता सीतेशी वाईट वागला नाही.
लवकरच घेईन जन्म
रावणाला कितीही शाप मिळाले तरी त्याने उन्मत्तपणा काही सोडला नव्हता. ब्राम्हणकुळात जन्माला आला असूनही त्याची सगळी लक्षणे ही त्याच्या आईची म्हणजेच राक्षसकुळाची होती. तो पृथ्वीवर थैमान घालत होता. त्याच्या जाचाला सगळी कंटाळली होती. पृथ्वीवर सत्कर्माचा लोप होत चालला होता. यज्ञात सतत बाधा आणली जात होती. त्यामुळे सगळ्या देवांनी क्षीरसागरावर जाण्याचे ठरवले. तेथे क्षीरसागरात भगवान विष्णू शेषनागावर पहुडले होते. त्यांच्याठिकाणी सूर्याचे तेज होते. ते साठ सहस्त्र योजन पसरले होते. अनंत शक्तींची स्वामिनी अशी लक्ष्मी विष्णूंची सेवा करत होती. ब्रम्हदेवासह सर्वांनी विष्णूंची उत्तमोत्तम शब्दात आळवणी केली. विष्णूंच्या सामर्थ्यांची प्रशंसा केली, आळवणी केली, ‘ हे भगवंता, मधुसुधना,करुणाघना तूच पूर्वी मस्त्यावतार धारण करुन महादैत्यांचा नाश केलास व वेदांचे रक्षण केले. मंदरपर्वत पाताळात जाऊ लागला असता तू कूर्मरुप धारण करुन तो पर्वत स्वत:च्या पाठीवर धारण केलास. भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी नरसिंहावतार घेतला. इंद्रासाठी बळीला पाताळात लोटलेस व त्याचा द्वारपाल झालास. आता रावण, कुंभकर्णादी दैत्यांनी पृथ्वीवर छळ मांडला आहे. त्यांच्यापासून सगळ्यांचे रक्षण कर.’
सर्वांनी अशी प्रार्थना केली असता क्षीरसागरातून दिव्य वाणी प्रकटली, ‘ सूर्यवंशातील दशरथ राजाच्या पोटी मी अवतार घेत आहे. शेष लक्ष्मण होईल. पांचजन्य भरत होईल. सुदर्शन शत्रुघ्न होईल. हे माझे पूर्णावतार आहेत. मिथिलेचा राजा जनक याच्या पोटी लक्ष्मी, सिता रुपाने जन्माला येईल. तुम्ही सर्वदेवांनी वानररुप अवतरावे. भगवान शंकर हनुमान होईल. ब्रम्हदेव जांबुवंत, धन्वंतरी सुषेण अवतार घेईल. अदिती आणि कश्यप म्हणजे कौसल्या व दशरथ असून त्यांच्या पोटी आत्माराम रघुवीर अवतार घेईल. सूर्याचा अवतार सुग्रीव होईल. अग्नीचा अवतार नळ, वायूचा अवतार नीळ होईल.
भगवान विष्णूने असे आश्वासन दिले आणि सगळ्या देवांमध्ये आनंदी आनंद झाला. आता प्रतिक्षा होती ती रघुवीरच्या जन्माची. (Ramayan katha)कशी वाटली नक्की कळवा
FAQ’S
रावण हा सगळ्यात मोठा शिवभक्त होता का?
हो, रावण हा सगळ्यात मोठा शिवभक्त होता. त्याने शिवाची मनापासून पूजा केली होती. त्यामुळेच त्याच्यावर शिवाची कृपा होती. त्याच्या लंकेत एक मोठे शिवलिंग होते. तो त्याची मनोभावे पूजा करत असेल. पण राक्षसकुळातील असल्यामुळे त्याच्यामध्ये राक्षसांचे गुणही होते. त्याने देवांचा छळ केला. त्याच्या छळाला सगळेच कंटाळले होते. (Ramayan Katha)
रावणाचा मृत्यू कोणाच्या हातून होणार होता?
रावणाचा मृत्यू हा दशरथ पुत्र रावणाच्या हातून होईल हे सगळ्यांनाच माहीत होते. स्वत: रावणालाही याची माहिती होती. त्याने दशरथाला संपवण्याचे कामही केले. पण त्यात तो असफल ठरला. कारण यासंदर्भातील आकाशवाणी ही फार पूर्वीच झाली होती.(Ramayan Katha)
भारतात रावणाचे मंदिर आहे का?
हो, रावण जरी राक्षसकुळातील असला तरी भगवान शिवावरील त्याची निस्सिम भक्ती ही सगळ्यांनाच परिचयाची आहे. आजही अनेक जण रावणाची पूजा करतात. रावणाची मंदिर भारतात कर्नाटक, उत्तर प्रदेश, कानपूर अशी देशभरात रावणाची पाच मंदिरे आहेत.
अधिक वाचा
Santoshi Mata Katha | संतोषी माता कथा 2023
मार्गशीर्ष गुरुवार कथा | MARGSHISH GURUVAR KATHA 2023
VAIBHAV LAKSHMI VRAT KATHA 2023 | महिमा ‘वैभवलक्ष्मी’ चा
महाराष्ट्राची गाणी | MAHARASHTRACHI GANI 2023
KAKAD AARTI | काकड आरती संग्रह मराठी 2023